खानापूर निमंत्रितांची व्हॉलिबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर येथे फिट फॉर लाईफ क्लब आयोजित निमंत्रितांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उप्पीन ब्रदर्स संघाने चंदगड वॉरियर्स संघाचा 2-0 अशा सेटमध्ये पराभव करून फिट फॉर लाईफ चषक पटकाविला.
खानापूर येथील स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 24 संघांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना उप्पीन ब्रदर्स वि. डीकेएफसी यांच्यात झाला. या सामन्यात उप्पीन बदर्स संघाने 25-13 आणि 25-18 अशा सेटमध्ये तर दुसऱया उपांत्य सामन्यात चंदगड वॉरियर्सने खानापूर वॉरियर्स संघाचा 25-19, 22-25, 15-10 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात उप्पीन ब्रदर्सने चंदगड वॉरियर्सचा 25-13, 25-17 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या उप्पीन ब्रदर्स संघाला 15 हजार रूपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या चंदगड संघाला 10 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू निखील चंदगड तर उत्कृष्ट स्मॅशर रमेश चंदगड यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. उप्पीन ब्रदर्स संघात प्रसाद आरेर, भिमराव चिपाडी, राहुल, श्रीधर वाळके, प्रशांत माळी, स्वप्नील पाटील, अनुप व ऋषिकेश यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. या संघाला ज्येष्ठ व्हॉलिबॉल खेळाडू व प्रशिक्षक हर्षवर्धन सिंगाडे व युवजन सेवा खात्याचे व्हॉलिबॉल प्रशिक्षक बसवराज होसमठ, संघमालक रवीसागर उप्पीन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.