वृत्त संस्था/ रिगा (लॅटव्हिया)
फिडेच्या स्वीस ग्रॅण्ड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताची महिला बुद्धिबळपटू डी.हरिकाने तिसऱया फेरीतील सामन्यात बल्गेरियाच्या विश्वविजेत्या ऍटोनेटा स्टीफेनोव्हाचा पराभव करत गुणतक्त्यात अन्य 9 स्पर्धकांसह संयुक्त आघाडी मिळविली.
या स्पर्धेत तिसऱया फेरीअखेर 9 बुद्धिबळपटूंच्या खात्यावर प्रत्येकी समान 2.5 गुण नोंद आहेत. यामध्ये जॉजियाच्या नेना डिगेंजीचा समावेश आहे. तिसऱया फेरीतील सामन्यात हरिकाने स्टीफेनोव्हाचा 68 व्या चालीत पराभव करत पूर्ण गुण वसूल केला. दुसऱया एका लढतीत भारताच्या पद्मिनी राऊतने आपल्याच देशाच्या आर. वैशालीचा तर वनटिका अगरवालने दिव्या देशमुखचा पराभव केला. राऊत आणि अगरवाल यांनी तिसऱया फेरीअखेर प्रत्येकी दोन गुण मिळविले आहेत.
पुरूषांच्या विभागात भारताचा ग्रॅण्डमास्टर सातवा मानांकित पी.हरिकृष्णाने चिलीच्या फर्नांडिसचा पराभव केला. हरिकृष्णाच्या खात्यावर 1.5 गुण आहेत. भारताचा 17 वर्षीय बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर सरिनने ऑस्ट्रेलियाच्या तेमूरचा 40 व्या चालीत पराभव केला.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या डी. गुकेश, ग्रॅण्डमास्टर के. शशीकिरण तसेच आर.प्रज्ञानंद, अर्जुन तसेच संधवानी यांनी आपल्या लढती बरोबरीत सोडविल्या. तिसऱया फेरीअखेर इराणचा फिरोजा खुल्या गटात आघाडीवर असून त्याने तिसऱया फेरीतील डावामध्ये पेडकिचा पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या 5 पुरूष आणि 5 महिला स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेतील आघाडीचे दोन स्पर्धक 2022 साली होणाऱया कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरतील.