ऑनलाईन टीम / हेलसिंकी :
हवामान आणि मानवाधिकार मुद्द्यांवर सक्रियपणे मोहीम राबविणाऱ्या 16 वर्षीय एवा मुर्तो यांना फिनलँडमध्ये एक दिवसासाठी पंतप्रधान म्हणून संधी देण्यात आली आहे. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी मुर्तो यांच्यासाठी एक दिवसासाठी आपले पद सोडले आहे.
एवा मुर्तो या लैंगिक भेदभाव दूर करण्याच्या मोहिमेचा भाग आहेत. प्लॅन इंटरनॅशनल या मानवतावादी संघटनेच्या गर्ल्स टेकओव्हर उपक्रमात फिनलँडच्या सहभागाचे हे चौथे वर्ष आहे. जगभरातील किशोरवयीन मुलांना एक दिवस नेते आणि इतर क्षेत्रांच्या प्रमुखांची भूमिका बजावण्यासाठी ही संघटना पुढाकार घेते. यंदा मुलींसाठी डिजिटल कौशल्ये आणि तांत्रिक संधींना प्रोत्साहन देण्यावर संस्थेचा भर आहे.
या उपक्रमानुसार, मुर्तो पंतप्रधान म्हणून तंत्रज्ञान, महिलांचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या अधिकारांबद्दल राजकारण्यांशी चर्चा करणार आहेत. मुर्तो म्हणाल्या, आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता केवळ बोलले जाते. मात्र, पृथ्वीवर कुठेही स्त्री-पुरुष समानता ठेवली जात नाही. याच प्रश्नावर आम्ही काम करत आहोत. अजूनही काही काम बाकी आहे, लवकरच ते आम्ही पूर्ण करू.