नाटोच्या सदस्यत्वावरून पुतीन संतप्त
युक्रेनवर बॉम्बवर्षाव करणाऱया रशियाने आता युरोपमधील छोटा देश असलेल्या फिनलंडला सैन्य कारवाईची धमकी दिली आहे. फिनलंडने नाटोचे सदस्यत्व स्वीकारल्यास विनाशकारी परिणाम भोगावे लागतील. यात सैन्यासह राजनयिक कारवाई देखील सामील असल्याचे रशियाने म्हटले आहे.
फिनलंडच्या गटनिरपेक्ष राहण्याच्या प्रतिबद्धतेला उत्तर युरोपच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण घटक मानतो असे रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी फिनलंडच्या पंतप्रधानांनी आमच्या राष्ट्रीय हितांवर संकट उभे ठाकल्यास आपण नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करणार असल्याचे म्हटले होते.
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उभा ठाकल्यास फिनलंड नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान साना मारिन यांनी संसदेला संबोधित करताना नमूद केले आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर फिनलंडने नाटोमध्ये सामील व्हावे की नाही ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. रशिया युरोपमध्ये नाटोच्या विस्ताराला विरोध करत असताना फिनंलडने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आमच्याकडे कुठल्याही क्षणी नाटोचे सदस्यत्व स्वीकारण्याचा पर्याय असल्याचे फिनलंडचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते.
प्रत्येक देशाला स्वतःच्या सुरक्षा धोरणावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आम्ही भूतकाळापासून शिकलो असल्याचे दाखवून दिले आहे. आम्ही आमच्या देशात युद्ध होऊ देणार नसल्याचे पंतप्रधान मारिन यांनी म्हटले आहे. फिनलंडच्या पंतप्रधानांच्या या घोषणेने रशिया संतापला आहे. फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यास रशियाला मोठा झटका बसू शकतो. फिनलंडची भौगोलिक स्थिती रशियाला नेहमीच धास्तावणारी राहिली आहे. नाटो युक्रेनच्या माध्यमातून नव्हे तर फिनलंडद्वारे रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतो.
रशियाची आर्थिक राजधानी आणि अब्जाधीशांचे शहर सेंट पीटर्सबर्ग हे फिनलंडच्या सीमेला लागून आहे. फिनलंड नाटोचा सदस्य झाल्यास रशियाच्या उत्तर सीमेवर नाटो पोहोचणार आहे. याचमुळे रशियाच्या विदेश मंत्रालयाने फिनलंडबरोबरच स्वीडनला देखील सैन्य कारवाईची धमकी दिली आहे. सेंट पीटर्सबर्ग शहर बाल्टिक समुद्राला लागून आहे आणि याच समुद्राच्या दुसऱया किनाऱयावर फिनलंड आहे. तेथे अनेकदा अमेरिकेच्या आण्विक पाणुबडय़ा येत असतात.