वार्ताहर/ विजापूर
फिनाईल विक्रीच्या नावाखाली दरोडा घातल्याची घटना विजापुरात उघडकीस आली आहे. दरम्यान, संशयितांनी सुमारे 2.20 लाखाची दागिने लंपास केली आहेत. ही घटना शहरातील शांती नगर येथे रविवारी दुपारी घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुलांच्या साहाय्यवाणी केंद्रात काम करीत असलेल्या सुनंदा तोळबंदी यांच्या घरी रविवारी दुपारी एक युवती फिनाईल विक्रीसाठी आली होती. दरम्यान, त्यांचा मुलगा केशव तोळबंदी याला फिनाईलचा वास दाखवून बेशुद्ध पाडले. त्यानंतर घरामध्ये प्रवेश करून घरात झोपलेल्या सुनंदा तोळबंदी आणि पती वासुदेव तोळबंदी यांच्या तोंडावरही स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केले. नंतर घरातील तिजोरीमधील 40 ग्रॅम सोन्याची आणि 220 ग्रॅम चांदीची दागिने लंपास करून फरारी झाले आहेत.
याप्रकरणी वासुदेव तोळबंदी यांनी विजपूर शहरातील गोलघुमट पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नियोजित सापळा रचला आहे. तसेच प्रकरणांचा चौकशीसाठी पथकाची स्थापणा करण्यात आली आहे, अशी माहिती विजापुरचे एसपी अनुपम अग्रवाल यांनी दिली.