मागील हंगामातील ‘फ्लॉप शो’नंतर पुन्हा विजयाच्या ट्रकवर परतण्याचे लक्ष्य, सुरेश रैनाचे पुनरागमन पथ्यावर पडणार का?
वृत्तसंस्था / चेन्नई
तीनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱया चेन्नई सुपरकिंग्स संघाचे फॅन फॉलोईंगही अफलातून आहे. धोनीवर जीव ओवाळून टाकणारे चाहते अजिबात कमी नाहीत. अर्थात, मागील हंगामात या अव्वल दर्जाच्या संघाला प्ले-ऑफपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला, त्यावेळी या सर्वांचीच सपशेल निराशा झाली होती आणि त्या अपयशापासून धडा शिकत चेन्नईसमोर पुन्हा एकदा विजयाच्या ट्रकवर परतण्याचे लक्ष्य असणार आहे. मागील हंगामात हा संघ सातव्या स्थानी फेकला गेला होता.
मागील हंगामात सुरेश रैनाने संयुक्त अरब अमिरातीतून स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच परतण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, यंदा रैना या संघात समाविष्ट आहे आणि त्याचे पुनरागमन संघाच्या पथ्यावर पडणार का, हे प्रत्यक्ष स्पर्धेत स्पष्ट होईल.
चेन्नई संघाकडे अनुभवाच्या निकषावर बरीच मजबुती आहे आणि धोनीचे कल्पक नेतृत्व हे त्यांचे मुख्य बलस्थान आहे. रैनाच्या पुनरागमनामुळे फलंदाजी आणखी मजबूत होईल. प्लेसिस, धोनी, अम्बाती रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम करण यांच्यासह नव्याने करारबद्ध मोईन अली व उत्तम प्रगल्भता दाखवत आलेल्या ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूंमुळे यंदा या प्रँचायझीकडून बऱयाच अपेक्षा आहेत.
लुंगी एन्गिडी, शार्दुल ठाकुर, सॅम करण, दीपक चहर हे या संघाच्या लाईनअपमध्ये आहेत. त्यामुळे, प्रतिस्पर्धी भक्कम फलंदाजांच्या लाईनअपला भेदण्याची ताकद या संघाकडे आहे. मात्र, मागील हंगामात संघातील अनेक अनुभवी खेळाडू अपेक्षित खेळ साकारु शकले नाहीत, त्याचा त्यांना फटका सोसावा लागला होता. अगदी धोनीसारखा जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फिनिशर देखील कमालीचा अपयशी ठरला होता.
जडेजाच्या फॉर्मकडे लक्ष
अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे घ्याव्या लागलेल्या मोठय़ा ब्रेकनंतर येथे आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने पुनरागमन करत आहे. त्यामुळे, त्याच्या फॉर्मकडे संघाचे लक्ष असेल. त्रिनिदादचा अनुभवी अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्हो अनेक दुखापतीमुळे झगडत असून ही देखील चेन्नईसाठी चिंतेची बाब ठरु शकते. यंदा आयपीएलचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होत असून यामुळे एरवी फिरकीवरच अधिक अवलंबून रहात आलेल्या चेन्नईला आपल्या रणनीतीत बरेच फेरबदल करावे लागतील. विशेषतः मुंबईत होणाऱया सामन्यात चेन्नईला अधिक दक्ष रहावे लागणार आहे.
यंदाही स्लो स्टार्ट?
चेन्नई सुपरकिंग्सचा संघ एरवी स्लो स्टार्टर्स म्हणून ओळखला जातो. यंदा देखील ते हीच परंपरा कायम राखणार की प्रारंभापासूनच उत्तम जडणघडण करत दमदार मोर्चेबांधणी करणार, याची देखील यंदा उत्सुकता असणार आहे. मागील हंगामात त्यांना खराब फलंदाजीचा फटका बसला होता. त्यामुळे, या आघाडीवर त्यांना अधिक काळजी घ्यावी लागेल.
अधिक ज्येष्ठ खेळाडूंचा ताफा… तारक की मारक?
यंदाच्या स्पर्धेत सहभागी सर्व प्रँचायझींचा विचार करता चेन्नई सुपरकिंग्सच्या खेळाडूंचे सरासरी वय सर्वाधिक आहे. एकीकडे, टी-20 क्रिकेटमध्ये युवा, तडफदार खेळाडूंचा ताफा सज्ज असताना ज्येष्ठांचा चेन्नई संघ या सर्वांना अनुभवाच्या बळावर मात देण्यात यशस्वी ठरणार का, याचे मुख्य औत्सुक्य असेल. धोनी, रैना, रायुडू व इम्रान ताहीर हे या संघातील ज्येष्ठ खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्त झाले आहेत आणि अगदी प्रथमश्रेणी क्रिकेटपासूनही ते बरेच दूर राहिले आहेत. साहजिकच, मॅच प्रॅक्टिसचा अभाव असल्याने ते येथे परिस्थितीशी कसे जुळवून घेणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.
जोश हॅझलवूड आयपीएलमधून बाहेर, संघाला मोठा धक्का
ऑस्ट्रेलियाचा अव्वल दर्जाचा जलद गोलंदाज जोश हॅझलवूडने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली असून हा चेन्नईसाठी स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का आहे. आगामी कालावधीत भरगच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असल्याने आपण आयपीएलमधून माघार घेत असल्याचे हॅझलवूडने म्हटले आहे.
‘मागील जवळपास 10 महिन्यांपासून सातत्याने विविध स्पर्धांमुळे बायो-बबलमध्ये रहावे लागले आणि विविध ठिकाणी क्वारन्टाईन देखील व्हावे लागले. त्यामुळे, मी आयपीएल स्पर्धेतून माघार घेणे पसंत केले आहे. या कालावधीत मी विश्रांती घेऊ शकेन व कुटुंबाला वेळही देऊ शकेन. आगामी कालावधीत आमच्या संघाचे भरगच्च सामने आहेत. टी-20 विश्वचषकानंतर लगेच ऍशेस असेल. पुढे विंडीज दौरा प्रदीर्घ असणार आहे आणि बांगलादेश टी-20 दौराही आहे. यामुळे, आयपीएलमध्ये सहभागी होणे व्यावहारिकदृष्टय़ा कठीण होते’, असे हॅझलवूड आपल्या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाला.
हॅझलवूडला मागील आयपीएल हंगामात फक्त 3 सामने खेळण्याची संधी लाभली आणि यंदा अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी त्याची स्पर्धा मोईन अली, सॅम करण, एन्गिडी, डेव्हॉन ब्रेव्हो यांच्याशी असणे अपेक्षित होते.
चेन्नई सुपरकिंग्सचा संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.