वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुरूवारी घोषित करण्यात आलेल्या फिफाच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या पुरूष फुटबॉल संघाने आपले 105 वे स्थान कायम राखले आहे. मात्र महिलांच्या मानांकनात भारतीय संघाचे स्थान घसरले असून ते आता 57 व्या स्थानावर आहेत. फिफाच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या 50 संघांच्या मानांकनात कोणताही बदल झालेला नाही. बेल्जियम पहिल्या, फ्रान्स दुसऱया, ब्राझील तिसऱया, इंग्लंड चौथ्या तर पोर्तुगाल पाचव्या स्थानावर आहे. युक्रेन आणि बहरीन बरोबरचा मित्रत्वाचा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. त्यामुळे बहरीनला एक गुण मिळाल्याने मानांकनात हा संघ 98 व्या क्रमांकावर राहिला. आगामी कालावधीत फिफाच्या विश्व करंडक पात्र फेरीचे सामने आशियामध्ये खेळविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे फिफाच्या 2021 सालातील अरब चषक स्पर्धेसाठीचे पात्र फेरीचे सामने होणार आहेत. यामध्ये आफ्रिका आणि आशिया खंडातील संघ भाग घेतील. ही स्पर्धा जूनच्या उत्तरार्धात होणार आहे. महिलांच्या फिफाच्या मानांकनात अमेरिका पहिल्या स्थानावर, जर्मनी दुसऱया, हॉलंड तिसऱया, फ्रान्स चौथ्या आणि स्वीडन पाचव्या स्थानावर आहे.