वृत्तसंस्था/ झुरिच
जूनअखेरीस घोषित करण्यात येणाऱया फिफाच्या विश्व मानांकन यादीत बेल्जियमने आघाडीचे स्थान मिळविले आहे. या मानांकन यादीत भारताने 1187 गुणांसह आपले 108 वे स्थान कायम राखले आहे.
फिफाच्या या मानांकन यादीत आघाडीच्या स्थानाकरता बेल्जियम, फ्रान्स आणि ब्राझिल यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण बेल्जियमने आपल्या नजीकच्या या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अग्रस्थान मिळविले आहे. या मानांकन यादीत फ्रान्स दुसऱया, ब्राझिल तिसऱया, इंग्लंड चौथ्या आणि उरुग्वे पाचव्या स्थानावर आहेत. क्रोएशियाने सहावे, पोर्तुगालने सातवे, स्पेनने आठवे, अर्जेंटिनाने नववे तर कोलंबियाने दहावे स्थान मिळविले आहे. कोरोना महामारी परिस्थितीमुळे विविध देशातील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या असल्याने फिफाच्या या मानांकन यादीत फारसा बदल झालेला नाही. आतापर्यंत कोविड-19 च्या महामारीत किमान चार लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
फिफाच्या या ताज्या मानांकन यादीत भारताने आपले 108 वे स्थान कायम राखले आहे. आता भारतीय फुटबॉल संघाचा आशियाई विजेत्या कतारबरोबरचा सामना भारतात 8 ऑक्टोबरला होणार आहे. 2022 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्र फेरीतील हा सामना राहील. भारतीय फुटबॉल संघाचा दुसरा सामना 12 नोव्हेंबरला बांगलादेशबरोबर बांगलादेशमध्ये होईल तर 17 नोव्हेंबरला अफगाण आणि भारत यांच्यातील सामना होणार असून या सामन्याचे यजमानपद अफगाण भूषवित आहे. भारतीय फुटबॉल संघाला क्रोएशियाचे फुटबॉल प्रशिक्षक स्टीमॅक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 2022 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्र स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारतीय संघाने पात्र फेरीच्या स्पर्धेत ‘ई’ गटात चौथे स्थान मिळविताना पाच सामन्यातून केवळ 3 गुण घेतले आहेत. या गटामध्ये एकूण पाच संघांचा समावेश असून बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे. फिफाची पुढील विश्व मानांकन यादी 16 जुलैला जाहीर केली जाईल.