क्रिस्टियानो रोनाल्डो, अनुभवी पेपे प्रमुख आकर्षण
वृत्तसंस्था/ लिस्बन (पोर्तुगाल)
कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पोर्तुगालचा 26 जणांचा संघ जाहीर केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू 37 वर्षीय क्रिस्टियानो रोनाल्डो आणि 39 वर्षीय पेपे या संघातील प्रमुख आकर्षण राहतील. रोनाल्डो आता आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत पाचव्यांदा फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सहभाग होत आहे.
पोर्तुगाल फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकांनी पुन्हा बचावफळीत खेळणाऱया 39 वर्षीय पेपेच्या कामगिरीवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पोर्तुगाल फुटबॉल संघाला फर्नांडो सँटोस या प्रमुख प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. रोनोल्डोला गेल्या तीन सामन्यामध्ये गोल नोंदवता आला नसला तरी त्याच्या दर्जेदार कामगिरीवर प्रशिक्षकाचा विश्वास आजही पुर्वीइतकाच आहे. 2016 साली युरोपियन चॅमिप्यनशिप फुटबॉल स्पर्धा तसेच 2019 साली युफाची नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया पोर्तुगाल संघाचे नेतृत्व रोनाल्डोने केले होते. फिफाच्या विश्वकरंडकावर आपले नाव कोरण्यासाठी पोर्तुगाल संघातील सर्व खेळाडू भुकेलेले आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात सर्वाधिक गोल (117) नोंदवणारा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. 2023 च्या फुटबॉल हंगामात प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत त्याने 4 सामन्यातून तीन गोल नोंदवले आहेत. रोनोल्डोने यापूर्वी रियल माद्रिद, जुवेंटस् या क्लबचे प्रतिनिधीत्व केले असून आता तो चॅम्पियन लिग स्पर्धेत मँचेस्टर संघाकडून खेळत आहे.
कतारमध्ये होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगालचा सलामीचा सामना 23 नोव्हेंबरला घानाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत पोर्तुगाल संघाचा च गटात समावेश असून त्यांचे या गटातील उरुग्वे आणि दक्षिण कोरियाबरोबर सामने होतील. 2022 ची फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
पोर्तुगाल संघ- गोलरक्षक-दियागो कोस्टा, जोस सा, रुई पॅट्रीसियो, बचावफळी-दियागो डेलोत, जोआवो कॅन्सेलो, डॅनिलो परेरा, पेपे, रुबेन डायस, अन्टोनियो सिल्वा, नुनो मेंडिस, राफेल गुरेरो, मध्यफळी- जोआवो पेलहिना, रुबेन नेव्हीस, बनार्दो सिल्वा, ब्रुनो फर्नांडिस, जोआवो मारियो, मथायस न्युनेस, व्हिटीना, विलियम कारवालो, ओस्टेविओ, आघाडीफळी-क्रिस्टियानो रोनाल्डो, जोआवो फेलिक्स, राफेल लिओ, रिकार्दो होर्ता, गोनकालो रॅमोस आणि आंद्रे सिल्वा.