वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे तर दुसऱया बाजूला उद्योगधंद्यांना आर्थिक बळाची मागणी सरकारकडे करण्यात येत आहे. यामध्येच भारतीय निर्यात संघटनेच्या महासंघाने (फियो) कोरोनाच्या विळख्यातून सावरण्यासाठी निर्यात क्षेत्राला आर्थिक मदतीची मागणी सरकारकडे केली आहे.
सदरचा दिलासा मिळण्यासाठी बँकांकडून व्याजमुक्त भांडवल आणि कर्जावरील सवलत मिळण्यासाठीची मागणी निर्यात संघटनेकडून करण्यात आली आहे. मदत मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या अडचणींचा आलेख मांडला आहे. देशातील निर्यातीवर व्यापक प्रमाणात प्रतिकूल परिणाम पडला आहे. त्यामुळे नव्याने या क्षेत्राला बळकटी निर्माण करण्यासाठी योग्य ती मदत आगामी काळात करण्यासाठीची विनंती सदर पत्रातून फियोने केली आहे.
निर्यातीमधील उत्पादनांचा समावेश
देशामधून निर्यात करण्यात येणाऱया उत्पादनांमध्ये प्रामुख्याने लेदर, रेशीम, हस्तशिल्प आणि कापड यांचा सर्वाधिक समावेश आहे. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे या क्षेत्रातील नियमीत होणाऱया निर्यातीचे प्रमाण काही प्रमाणात घटल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचेही म्हटले आहे.