चौथी व शेवटची कसोटी : इंग्लंड सर्वबाद 205, अक्षर पटेलचे 68 धावात 4 तर रविचंद्रन अश्विनचे 47 धावात 2 बळी, सिराजला दुहेरी यश, स्टोक्सचे अर्धशतक
वृत्तसंस्था / अहमदाबाद
अक्षर पटेल (4-68) व रविचंद्रन अश्विन (2-47) या गोलंदाजांच्या फिरकी भुलभुलैय्यात आणखी एकदा अडकलेल्या इंग्लिश क्रिकेट संघाचा पहिला डाव अवघ्या 205 धावांमध्येच गडगडला. भारताविरुद्ध या चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात युवा जलद गोलंदाज सिराजने 45 धावात 2 बळी घेतले तर नवोदित फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने 14 धावात 1 फलंदाज बाद केला. प्रत्युत्तरात दिवसअखेर भारताची 1 बाद 24 अशी खराब सुरुवात झाली. शुभमन गिल भोपळा न फोडताच तंबूत परतला तर रोहित शर्मा 8, चेतेश्वर पुजारा 15 धावांवर नाबाद राहिले.
बाऊन्स व टर्नला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय बुमरँगप्रमाणे त्यांच्यावर उलटल्याचे पहिल्या दोन सत्रातच स्पष्ट झाले. अष्टपैलू बेन स्टोक्सने 55 धावांची धीरोदात्त, संयमी खेळी साकारली असली तरी अक्षर पटेल व अश्विनच्या भेदक माऱयासमोर त्यांची दाणादाण उडाली. इंग्लंडने या मालिकेत 200 धावांचा टप्पा सर करण्याची ही केवळ दुसरी वेळ होती.
झॅक क्रॉली (9) व डॉम सिबली (2) या दोन्ही सलामीवीरांना अक्षरने डावातील पहिल्या 8 षटकातच तंबूत माघारी पाठवले आणि या मालिकेत एक तडफदार द्विशतक झळकावणाऱया रुटला (5) सिराजने पायचीत केल्यानंतर इंग्लंडची 3 बाद 30 अशी दैना उडाली. मोटेराच्या खेळपट्टीवर एकदा जम बसल्यानंतर स्टोक्सने रिव्हर्स स्वीपसारखे फटके खेळणे सुरु केले. पण, नंतर तो ही फिरकी गोलंदाजाचाच बळी ठरला. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न चुकल्यानंतर स्टोक्सला वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पायचीत होत परतला.
स्टोक्स (55) व जॉनी बेअस्टो (28) यांनी चौथ्या गडय़ासाठी 48 धावांची भागीदारी केली असली तरी ती देखील एका अर्थाने क्षणभंगूर ठरली. सिराजने बेअरस्टोला पायचीत करत ही जोडी फोडली. त्यानंतर बेन स्टोक्सने ओली पोपच्या (29) साथीने पाचव्या गडय़ासाठी 43 धावा जोडल्या. स्टोक्सला वॉशिंग्टन सुंदरने पायचीत केले.
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या डॅन लॉरेन्सने 46 धावांची खेळी साकारल्यामुळे इंग्लंडला 200 धावांचा टप्पा कसाबसा पार करता आला. बेन फोक्स (1), डॉम बेस (3), जॅक लीच (7) व जेम्स अँडरसन (नाबाद 10) या तळाच्या फलंदाजांना फारशी भरीव कामगिरी करता आली नाही.
शुभमन गिल शून्यावर बाद
इंग्लंडचा डाव 205 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताची सलामी जोडी फलंदाजीला उतरली. मात्र, शुभमन गिल खाते उघडण्यापूर्वीच बाद झाल्याने यजमान संघाला पहिला धक्का बसला. अनुभवी रोहित शर्मा (नाबाद 8) व चेतेश्वर पुजारा (नाबाद 15) यांनी संघाला 12 षटकात 1 बाद 24 धावांपर्यंत नेले. इंग्लंडतर्फे अँडरसनने एकही धाव न देता गिलची विकेट घेतली.
भारतीय संघ मालिकेत 2-1 फरकाने आघाडीवर असून शेवटची कसोटी जिंकली किंवा बरोबरीत राखली तरी भारताचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.
जेव्हा सिराज म्हणाला, उसने मुझे गाली दी, तो मैने विराट भाई को बोल दिया!
या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सिराजला बेन स्टोक्सने स्लेजिंग केले आणि यामुळे उभयतात शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर सिराजने विराटला याची कल्पना दिल्यानंतर विराटने थेट स्टोक्सला समज दिली आणि पुढे मैदानी पंचांनी हस्तक्षेप करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेबद्दल बोलताना सिराज म्हणाला, ‘उसने मुझे गाली दी तो मैने विराट भाई को बोल दिया और उन्होने मामले को संभाल लिया’!
रुटने पुन्हा नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली अन् पुन्हा डाव गडगडला!
इंग्लिश कर्णधार जो रुटने तिसऱया कसोटी सामन्याप्रमाणेच येथे चौथ्या कसोटीत देखील नाणेफेक जिंकली व येथेही प्रथम फलंदाजीच स्वीकारली. पण, योगायोग म्हणजे तिसऱया कसोटीप्रमाणे येथे चौथ्या कसोटीतही त्यांचा प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी तिसऱया कसोटीत त्यांचा पहिला डाव 112 धावांवर आटोपला होता तर येथे चौथ्या कसोटीत त्यांचा पहिला डाव 205 धावांवर गडगडला.
ढोपराच्या दुखापतीमुळे आर्चर सामन्यातून बाहेर, स्टोक्सही हैराण
इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर भारताविरुद्ध या चौथ्या कसोटीत ढोपराच्या दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. बेन स्टोक्ससह काही इंग्लिश खेळाडू अपचनाच्या तक्रारीमुळे त्रस्त आहेत, असे इंग्लिश क्रिकेट मंडळाने जाहीर केले. जोफ्रा आर्चरला या मालिकेतील दुसऱया कसोटी सामन्यात देखील ढोपराच्या दुखापतीमुळेच खेळता आले नव्हते.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : झॅक क्रॉली झे. सिराज, गो. अक्षर 9 (3 चेंडूत 1 चौकार), डॉम सिबली त्रि. गो. अक्षर 2 (8 चेंडू), जॉनी बेअरस्टो पायचीत गो. सिराज 28 (67 चेंडूत 6 चौकार), जो रुट पायचीत गो. सिराज 5 (9 चेंडूत 1 चौकार), बेन स्टोक्स पायचीत गो. वॉशिंग्टन सुंदर 55 (121 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), ओली पोप झे. शुभमन, गो. अश्विन 29 (87 चेंडूत 2 चौकार), डॅन लॉरेन्स यष्टीचीत पंत, गो. पटेल 46 (74 चेंडूत 8 चौकार), बेन फोक्स झे. रहाणे, गो. अश्विन 1 (12 चेंडू), डॉम बेस पायचीत गो. पटेल 3 (1 चेंडू), जॅक लीच पायचीत गो. अश्विन 7 (17 चेंडूत 1 चौकार), जेम्स अँडरसन नाबाद 10 (15 चेंडूत 1 चौकार). अवांतर 10. एकूण 75.5 षटकात सर्वबाद 205.
गडी बाद होण्याचा क्रम
1-10 (सिबली, 5.2), 2-15 (झॅक, 7.5), 3-30 (रुट, 12.1), 4-78 (बेअरस्टो, 28.1), 5-121 (स्टोक्स, 46.4), 6-166 (ओली पोप, 61.3), 7-170 (फोक्स, 65.4), 8-188 (लॉरेन्स, 70.1), 9-189 (बेस, 70.4), 10-205 (जॅक लीच, 75.5).
गोलंदाजी
इशांत शर्मा 9-2-23-0, मोहम्मद सिराज 14-2-45-2, अक्षर पटेल 26-7-68-4, रविचंद्रन अश्विन 19.5-4-47-3, वॉशिंग्टन सुंदर 7-1-14-1.
भारत पहिला डाव : शुभमन गिल पायचीत गो. अँडरसन 0 (3 चेंडू), रोहित शर्मा खेळत आहे 8 (34 चेंडूत 1 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 15 (36 चेंडूत 1 चौकार). अवांतर 1. एकूण 12 षटकात 1 बाद 24.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (गिल, 0.3).
गोलंदाजी : जेम्स अँडरसन 5-5-0-1, बेन स्टोक्स 2-1-4-0, जॅक लीच 4-0-16-0, डॉम बेस 1-0-4-0.