प्रतिनिधी/ पणजी
घरात विलगीकरण केलेले रुग्ण बाहेर पडल्यास त्याला ट्रक करण्यासाठी सरकारने जीपीएस बेस ‘कोविड लोकेटर ऍप’ सुरू केले आहे. या ऍपद्वारे घरातून बाहेर पडणारे संशयित रुग्ण शोधून काढणे शक्य होणार आहे.
या ऍपमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. इन्टूजीनच्या सहकार्याने हे ऍप तयार करण्यात आले आहे. हे ऍप ऍन्ड्रॉईड प्ले स्टोअरमध्ये डाऊनलोड करणे शक्य आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न चालविले आहेत. कोरोनाच्या संशयित रुग्णांना अनेक भागामध्ये त्यांच्या राहत्या घरात विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे. शिक्का मारला असताना व घराबाहेर न पडण्याची सूचना केली असतानाही अनेक रुग्ण घराबाहेर पडतात. या रुग्णांना घराबाहेर फिरताना पाहिल्यानंतर लोकांची घाबरगुंडी उडते. सरकारकडेही अशाप्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडणाऱया अशा संशयित रुग्णांना शोधून काढण्यासाठी हे ऍप तयार करण्यात आले आहे.
आणखी 18 नमुने नकारात्मक
गोव्यात गोमेकॉत बसविण्यात आलेल्या पॅथोलॅबमध्ये चाचणी केलेले 18 संशयित रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. उर्वरित तीन संशयित रुग्णांचे नमुने आज सोमवारी तपासण्यात येणार आहेत.