वृत्तसंस्था/ पुणे
येथे सुरू असलेल्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी ब गटातील झालेल्या सामन्यात फिलिपाईन्सने इंडोनेशियाचा 6-0 अशा गोलफरकाने पराभव करत बाद फेरीत प्रवेश मिळविला. गुरुवारच्या अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने थायलंडचा 2-1 असा पराभव करत ब गटात आघाडीचे स्थान पटकावले.
फिलिपाईन्सने या विजयासह ब गटातील आपले सर्व सामने संपविले असून ते या गटात 6 गुणांसह वरच्या स्थानावर आहेत. या गटात ऑस्ट्रेलिया आणि चिनी तैपेई हे दोन्ही संघ फिलिपाईन्सपेक्षा 3 गुणांनी आघाडीवर आहेत. फिलिपाईन्सने सलग दुसऱयांदा या स्पर्धेची बाद फेरी गाठली आहे. गुरुवारच्या सामन्यात चौथ्या मिनिटाला फिलिपाईन्सने आपले खाते उघडले. स्पॉट किकवर गुलीयुने फिलिपाईन्सचा पहिला गोल केला. 27 व्या मिनिटाला फिलिपाईन्सचा दुसरा गोल सारिना बोल्डेनने हेडरद्वारे केला तर 56 व्या मिनिटाला तिसरा गोल ऍनिसने नोंदविला. 73 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर फिलिपाईन्सने चौथा गोल नोंदविला. फिलिपिन्सच्या रँडेल आणि मिकलेट यांनी हा गोल केला. 83 व्या मिनिटाला ऍनिसने संघाचा पाचवा आणि वैयािफिलिपाईन्सचा सहावा आणि शेवटचा गोल नोंदवून इंडोनेशियाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.
ऑस्ट्रेलिया विजयी
गुरुवारी झालेल्या या स्पर्धेतील ब गटातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने थायलंडवर 2-1 अशी बाजी मारली. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाच्या महिला फुटबॉल संघाने ब गटात आघाडीचे स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्यांचा पुढील सामना कोरिया प्रजासत्ताकबरोबर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 39 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. ऑस्ट्रेलियाचा हा गोल केरने नोंदविला. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने थायलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 80 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल सिमॉनने नोंदविला. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना थायलंडचा एकमेव गोल बदली खेळाडू पेनीसोकने केला.