जगभरात 1 कोटी 51 लाख 18 हजार 5 कोरोनाबाधित : 6 लाख 20 हजार 43 जणांचा मृत्यू : युरोपमध्ये संकट ओसरले
जगभरात आतापर्यंत 1,51,18,005 जणांना कोरोना महामारीची बाधा झाली आहे. यातील 91 लाख 34 हजार 354 बाधितांना महामारीपासून मुक्तता मिळाली आहे. तर 6 लाख 20 हजार 43 बाधितांचा आतापर्यंत मृत्यू ओढवला आहे. जगभरात आता 63,785 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. फिलीपाईन्सने संसर्गाचा धोका पाहता देशातील 21 हजार कैद्यांची मुक्तता केली आहे. सरकारचे सचिव इडुआर्डो एनो यांनी बुधवारी या संबंधी माहिती दिली आहे. 17 मार्च ते 13 जुलैदरम्यान या कैद्यांची देशातील 470 तुरुंगांमधून मुक्तता करण्यात आली आहे. फिलीपाईन्सच्या तुरुंगांमध्ये कैद्यांची संख्या अधिक असल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका होता.
झिम्बाम्बेत संचारबंदी
झिम्बाम्बचे अध्यक्ष एमर्सन मनांगाग्वा यांनी देशभरात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. सुरक्षादल सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गस्त घालणार असून लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात येणार आहे. परंतु धान्यखरेदी आणि उपचारासारख्या अत्यावश्यक कामांसाठी लोकांना घरातून बाहेर पडता येणार आहे. दोन शहरांदरम्यान लोकांना प्रवास करण्यास मनाई आहे. एका ठिकाणी 50 लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
स्पेनकडून मदतनिधी
विकसनशील देशांना कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी स्पेन 1.7 अब्ज युरोंचा निधी स्पेन देणार आहे. स्पेनचे विदेशमंत्री अरांचा गोंजालेज यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. या निधीमुळे लोकांचा जीव वाचविता येईल आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत सुधारणा घडू शकेल, अशी अपेक्षा स्पेनला असल्याचे ते म्हणाले. स्पेनमध्ये आतापर्यंत 28 हजार 414 जणांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे.
बोलिवियात संकट
बोलिवियामध्ये पोलिसांनी मागील 5 दिवसांमध्ये गल्ल्या आणि घरांमधून 400 मृतदेह हस्तगत केले आहेत. नॅशनल पोलीस डायरेक्टर इवाल रोजेस यांच्यानुसार यातील 85 टक्के जणांचा (सुमारे 340) मृत्यू संसर्गामुळे झाल्याचा संशय आहे. उर्वरितांचा मृत्यू आजार तसेच अन्य कारणांमुळे झाला असावा. चोचाबांब भागामधून 191, ला पाज येथून 14 आणि सँटा क्रूजमधून 68 मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. या दोन्ही भागांमध्ये मागील आठवडय़ापासून रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. सर्व मृतांची ओळख पटविली जात आहे.
नेपाळने टाळेबंदी हटविली
नेपाळ सरकारने बुधवारपासून टाळेबंदीशी संबंधित निर्बंध संपुष्टात आणले आहेत. तेथे 24 मार्च रोजी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. आणखी अधिक काळ टाळेबंदीत राहण्याची गरज नाही. टाळेबंदीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून ती दूर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु संसर्गाचा धोका पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क, सॅनिटायजरचा वापर सुरूच ठेवावा लागणार असल्याचे नेपाळचे सरकारचे प्रवक्ते खाटीवाडा यांनी सांगितले आहे.
चीनमध्ये 14 नवे रुग्ण
चीनच्या जिनजियांग प्रांतात 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एक दिवसापूर्वी देखील तेथे 11 बाधित सापडले होते. चीनच्या आरोग्य आयोगानुसार नव्या रुग्णांमध्ये 9 जण जिनजियांग प्रांतातील दुर्गम भागाचे रहिवासी आहेत. तर 5 बाधित विदेशातून परतले होते. चीनच्या या प्रांतात मागील महिन्यात बाधित सापडल्यावर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.
मेक्सिको : 915 बळी
मेक्सिकोत मागील 24 तासांमध्ये 915 बाधितांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा 40 हजार 400 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार मागील 24 तासांमध्ये 6 हजार 859 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 3 लाख 56 हजार 255 झाली आहे. कोरोनाच्या बळींप्रकरणी अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटननंतर मेक्सिकोचा चौथा क्रमांक लागतो.
पाक : प्लाझ्माचा काळाबाजार
पाकिस्तानात कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांच्या प्लाझ्माचा काळाबाजार सुरू आहे. गरजू रुग्णांसाठी सरकारकडून प्लाझ्मा प्राप्त करण्यात येत आहे. परंतु प्लाझ्मा प्राप्त करण्यासाठी प्रतीक्षा यादी आहे. अशा स्थितीत गरजू बाधित बेकायदेशीर मार्गाने प्लाझ्माची खरेदी करू लागले आहेत. पाकिस्तानात आतापर्यंत 2 लाख 67 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले असून 5,677 जणांचा बळी गेला
आहे.
कतार : आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू
कतार पुढील महिन्यापासून विदेश प्रवासाची अनुमती देणार आहे. कतारच्या लोकांना 1 ऑगस्टपासून अन्य देशात जाण्याची आणि तेथून परतण्याची अनुमती मिळणार आहे. तर अन्य देशांमध्ये अडकून पडलेले लोकही कतारमध्ये परत येऊ शकतील. कमी जोखीम असलेल्या देशांमधून परतणाऱया लोकांना स्वतःची चाचणी करवून घ्यावी लागेल तसेच 7 दिवस गृह विलगीकरणाचे पालन करावे लागणार आहे. प्रवासाच्या 48 तासांपूर्वी कुठल्याही मान्यताप्राप्त चाचणी केंद्राकडून संसर्गमुक्त प्रमाणपत्र मिळविले असले तरीही पुन्हा चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.
चिनी नागरिकांवर हॅकिंगचा आरोप
कोरोनावरील लस तयार करणाऱया कंपन्यांचे संगणक हॅक करण्याचा गुन्हा चीनच्या दोन हॅकर्सच्या विरोधात अमेरिकेने नोंदविला आहे. अमेरिकेच्या कायदा विभागाने यासंबंधी माहिती दिली आहे. चीनचे दोन हॅकर्स जगातील विविध भागांमध्ये कोरोनावरील लस तयार करणाऱया संगणक हॅक करण्याचा प्रयत्न करत होते, असे अमेरिकेच्या कायदा विभागाकडून सांगण्यात आले
आहे.
चीनसोबत काम करण्यास तयार
कोरोनावरील लस लवकर प्राप्त करण्यासाठी माझे प्रशासन चीनसह कुठल्याही देशासोबत काम करण्यास तयार असल्याचे उद्गार अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. लस तयार करण्यासाठी आम्ही अत्यंत चांगल्याप्रकारे काम करत आहोत. अपेक्षेपेक्षाही ही लस लवकर प्राप्त होण्याची शक्यता आहे. लस त्वरित लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून अमेरिकेच्या सैन्याकडून त्याचे वाटप होणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेत कोरोनावरील लस निर्माण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून यात यशही मिळत आहे.