ऑनलाईन टीम / मनिला :
दक्षिण फिलिपीन्समधील जोलो शहरात इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात 14 सैनिक आणि सामान्य नागरिक ठार झाले. तर 75 सैनिक आणि पोलीस जखमी झाले आहेत. प्रादेशिक लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल कॉर्लेटो विलुलुआन यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सुलू प्रांतातील जोलो शहरात सैन्याच्या दोन ट्रकमध्ये पार्क केलेल्या एका मोटरसायकलवर आयईडी बॉम्ब बसवण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात 5 सैनिक आणि 4 नागरिक ठार झाले. दरम्यान, स्फोटानंतर सैनिक काही जणांची तपासणी करत असतानाच एका दुकानाजवळ दुसरा स्फोट झाला. एका महिला दहशतवाद्यांने हा बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात महिलेसह 4 सैनिक ठार झाले.
स्फोटात जखमी झालेल्या 75 जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यानंतर बाजारात एक जिवंत बॉम्बही मिळाला आहे. सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षेत्रात घेराबंदी केली आहे. जोलो शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.