वृत्तसंस्था / मुंबई
एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फिलिपिन्सचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. भारताला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असून त्यांचे सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. भारतीय संघातील 12 खेळाडू कोरोनाबाधित झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी झालेल्या ब गटातील या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. सामन्याच्या उत्तरार्धात एकूण 4 गोल नोंदविले गेले. 51 व्या मिनिटाला सॅम केरने हेडरद्वारे ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. 53 व्या मिनिटाला डॉम्निकी रँडेलने आपल्या (फिलिपिन्सच्या) गोलपोस्टमध्ये चेंडू नजरचुकीने लाथाडून ऑस्ट्रेलियाला हा बोनस गोल बहाल केला. ऑस्ट्रेलियातर्फे इमेली एग्मंड आणि मेरी फौलेर यांनी प्रत्येकी एक गोल केला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंडोनेशियाचा 18-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला होता. आता या दोन विजयामुळे ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून त्यांचा पुढील सामना थायलंडबरोबर गुरूवारी होणार आहे.
या स्पर्धेतील झालेल्या दुसऱया एका सामन्यात दक्षिण कोरियाने म्यानमारवर 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळविला. या विजयामुळे दक्षिण कोरियाचा संघ स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळविण्याच्या समीप पोहचला आहे. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. उत्तरार्धातील खेळाच्या पाचव्या मिनिटाला कोरियाच्या चो हेयूनने हेडरद्वारे गोल नोंदविला. सामना संपण्यास 6 मिनिटे बाकी असताना ली मिनने दक्षिण कोरियाचा दुसरा गोल करून म्यानमारचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत क गटातील पुणे येथे होणाऱया सामन्यात जपानने व्हिएतनामचा पराभव केला तर दक्षिण कोरिया संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविता येईल.