मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
आयनोक्य आणि ईएसजीच्या (गोवा मनोरंजन संस्था) नूतनीकृत मल्टीप्लेक्यचे उद्घाटन तसेच ईएसजीच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजीत झाले. ईएसजी आता स्वयंपूर्ण होत असून ‘फिल्म सिटी’ विकसित करण्यासाठी मोठा वाव आहे आणि त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, नूतनीकरण झालेल्या या मल्टीप्लेक्समध्ये उच्च दर्जाच्या साधनसुविधा असून लॉकडाऊनमध्ये तसेच कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक कामे, उद्योग ठप्प झाले असले तरी आयनॉक्य नूतनीकरणाचे काम मात्र सुरूच होते. म्हणून ते काम 8 ते 9 महिन्याच्या काळात पूर्ण झाले. मोठय़ा रक्कमेचे हे काम पुन्हा नवीन निविदा मागवून करण्यात आल्याने अनेक कोटींचा निधी वाचवता आला, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. हा आयनॉक्स प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगून त्यांनी संबंधितांचे कौतुक केले.
ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, भाडय़ाच्या स्वरूपात नवीन आयनॉक्समधून प्रति महिना 54 लाखांची रक्कम मिळणार आहे. प्रतिवर्षी ती रक्कम वाढत जाणार आहे. नूतनीकरण करताना सरकारला अनेक अडचणी आल्या पण त्यावर मात करण्यास ईएसजीला यश आले. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या अनेक सोयीसुविधा नवीन मल्टीप्लेक्समध्ये देण्यात आल्या आहेत त्यामुळे दर्शकांना एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे. नुतनीकरणासाठी 22 कोटी खर्च झाल्याचे ते म्हणाले.
ईएसजीचे सीईओ अमित सतीजा, आयनॉक्सचे सीईओ आलोक टंडन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पणजीचे महापौर उदय मडकईकर हे देखील उपस्थित होते. आयनॉक्स मल्टीप्लेक्सच्या स्कीन 1 मध्ये हा उद्घाटनचा कार्यक्रम झाला. सस्थेचे कार्यकारी सदस्य शर्मद रायतूरकर यांनी आभार मानले तर रीना बारॅटो यांनी सूत्रसंचालन केले.
नूतनीकरण झालेल्या आयनॉक्सला नवा साज चढला असून आसने, अंतर्गत सजावट लक्षवेदी झाली आहे. उच्च दर्जाच्या साधन सुविधा, साऊंड सिस्टीम तेथे देण्यात आली असून बाहेरील सजावटी आकर्षक करण्यात आली आहे.