शेखर मोरे-पाटील यांनी नाव न घेता साविआच्या नगरसेवकांना ठणकावले
प्रतिनिधी / सातारा
गोडोली तळय़ासाठी आंदोलने केलेली आहेत. गोडोली पथदिव्याचे काम स्वतः उभे राहून केले आहे. जुने दिवे बदलून त्या ठिकाणी नवे दिवे बसवण्यात यावेत, अशी मागणी करुन दिवे बसवेपर्यंत पालिकेकडे पाठपुरावा केला. गोडोली तळे वाचवण्यात गोडोली ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे, न केलेल्या कामाचे श्रेय कोणी घेवू नये, अन्यथा जागा दाखवून देवू अशा शब्दात नगरविकासचे नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी सातारा विकास आघाडीच्या त्या नगरसेवकाचे नाव न घेता ठणकावले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जनहित याचिका दाखल करुन गोडोली तळे वाचवले आहे. त्यासाठी गोडोली भैरवनाथ ट्रस्टने विविध कामांसाठी व गोडोली सुशोभिकरणासाठी गोडोली ग्रामस्थांनी देणगी दिली. त्यातूनच तळय़ाच्या पिचिंगचे व स्वच्छ पाणी साठवण्यासंदर्भात मदत केली. गोडोली तळे वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात मग मी शेखर मोरे-पाटील, नरेंद्र पाटील, व्यंकटराव मोरे यांच्यावर ट्रेस पासचे गुन्हे दाखल झाले. गोडोली तलाव सुशोभिकरणासाठी गावातील प्रत्येक ग्रामस्थांचा सहभाग आहे. त्याचे श्रेय कोणा एका व्यक्तीला जात नाही. गोडोली तळय़ाच्या दक्षिण बाजूला असलेल्या भैरवनाथ ओढय़ावर ज्या तीन फुटी पाईप टाकण्यात आल्या. त्यावेळी निर्माण झालेल्या कृत्रिम पूरपरिस्थितीला जबाबदार व्यक्ती समस्येचे निवारण करण्याऐवजी घरात बसले. ज्या पूरपरिस्थिती गोडोलीकरांचे प्रचंड नुकसान झाले. त्या धक्कातून गोडोलीकर अजून सावलेले नाहीत. कृपा करुन न केलेल्या कामाचे श्रेय घेवू नये. गोडोली तलाव सुशोभिकरणासाठी 2 कोटी 46 लाख रुपयांची तरतूद आमदार शिवेंद्रराजे यांनी करुन जिल्हा नियोजनमधून केली आहे. त्याचा पोटशुळ त्यांना उठला आहे. असले प्रकार बंद करावेत अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवून देवू असा इशारा दिला आहे.
गोडोलीतल्या रस्त्याच्या कामाला शुभारंभ
गोडीली येथील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आज संपन्न झाला. गोडोली मातंग वस्ती मधील रस्त्याच्या डांबरीकरणाचा वसंत गायकवाड, अनिल पवार, राजू रामुगडे, संतोष पवार, धनराज पटेल, सदाशिव मोरे, युवराज मोरे, पप्पू पवार, विनोद मोरे, पोपटराव मोरे, नगरसेवक शेखर मोरे पाटील उपस्थितीत होते. जुनी मराठी शाळा ते शेवंता जनरल स्टोअर्सपर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नामदेव पवार, जगदीश पवार, श्रीरंग साळुंखे, धनराज पटेल, संजय कोरे, नितीन पवार, विनोद मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.