क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
फुटबॉलला चालना देण्यासाठी देशातील फुटबॉल क्लबांनी फुटबॉल अकादमी तयार करण्यावर भर द्यावा, असे भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार प्रसून बॅनर्जी म्हणाले. काल दक्षिण गोव्यातील एका पंचताराकीत हॉटेलमध्ये त्यांनी क्रीडा पत्रकारांशी संवाद साधला. आयएसएलमध्ये खेळणाऱया सर्व संघासाठी फुटबॉल अकादमींची निर्मिती आवश्यक असायला पाहिजे व यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पुढाकार घ्यावा, असे बॅनर्जी म्हणाले.
70 आणि 80 च्या दशकात कोलकाताच्या बलाढय़ मोहन बागानचे बचावपटू म्हणून प्रतिनिधीत्व करणारे प्रसून बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ अधिक बळकट व्हावा आणि भारतीय फुटबॉल संघ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळताना पाहण्याची आपली इच्छा असल्याचे यावेळी सांगितले.
गोवा हे केंद्र आयएसएल फुटबॉलच्या आयोजनासाठी एक चांगले केंद्र असल्याचे पश्चिम बंगालच्या हावडाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करणारे खासदार बॅनर्जी यावेळी म्हणाले. आयएसएल फुटबॉल स्पर्धा ही आशिया खंडातील एक उत्कृष्ट स्पर्धा असल्याचे सांगून आमचे देशी फुटबॉलपटूंही या स्पर्धेत आपली छाप पाडताना दिसतात आणि ती चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. दर्जेदार विदेशी फुटबॉलपटूंसमवेत आणि विरुद्ध खेळून भारतीय फुटबॉलपटूंच्या दर्जाचा आलेखही निश्चितच वाढला असल्याचे 65 वर्षीय प्रसून बॅनर्जी म्हणाले.
पूर्वी धेंपो, साळगावकर, चर्चिल ब्रदर्स, मोहन बागान, ईस्ट बंगाल या संघांत एक -दोन विदेशी फुटबॉलपटू असायचे. आता आयएसएलमध्ये सहभागी संघांत ही संख्या वाढल्याने स्पर्धाही रोमहर्षक झाल्याचे सांगून ही स्पर्धा जिंकायला आता शेवटच्या स्थानावर एक वेळ असलेल्या ईस्ट बंगाललाही संधी असल्याचे ते म्हणाले. आयएसएल स्पर्धेचा दर्जा वाढण्याबरोबरच भारतीय फुटबॉलपटूंही चांगली कामगिरी करत असल्याचे ते म्हणाले. हे व्यासपीठ तयार केल्याबद्दल त्यांनी नीता अंबानी यांचे यावेळी आभार
मानले.
बॅनर्जी यांनी यावेळी गोव्याचे अर्जुन पुरस्कार विजेते फुटबॉलपटू ब्रुनो कुतिन्हो आणि ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी केलेल्या मेहनतीची आणि शिस्तीची उदाहरणे दिली. आमच्यावेळी ब्रुनो हा तरूण होता आणि तो खूप चांगला खेळाडू होता. ब्रम्हानंदही नंतर आले व ते स्वतःच्या हिकमतीवर एक अव्वल फुटबॉलपटू बनले, असे खासदार बॅनर्जी म्हणाले. आमच्या काळात आम्हाला फुटबॉलमध्ये प्रोफेशनल्स बनण्यासाठी तेवढा आधार नव्हता. आता पाठिंबा मिळतो पण तो आणखी मिळाला पाहिजे, असे बॅनर्जी म्हणाले.
आमच्या देशात जास्त फुटबॉल अकादमी नाहीत. पूर्वी फक्त टाटा फुटबॉल अकादमी होती. मोठय़ा क्लबमध्ये खेळू इच्छित असलेल्या प्रत्येक संघासाठी प्रथम फुटबॉल अकादमी स्थापन करणे आवश्यक आहे. कोणत्याही लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी ही अट असणे आवश्यक असल्याचे बॅनर्जी यावेळी म्हणाले.
सध्याची लीग प्रणाली लवकरात लवकर प्रमोशन आणि डिमोशनसह सुधारली पाहिजे, ज्यामुळे खेळाडूंना त्यांचे स्थान आणि संघासाठी संघर्ष करण्याची अधिक कारणे मिळतील. बॅनर्जी यांनी चांगला आहार, पोषण तसेच तंदुरूस्ती आणि इतर सुविधांवर भर दिला. आमच्या काळात बरेच चांगले खेळाडू होते, पण त्यांना आवश्यक असलेला पाठिंबा न मिळाल्याने ते तरूण वयातच संपले. फुटबॉल खेळात अधिक प्रोफेशनलीझम येण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि आयएसएल यांनी प्रथम क्लब्सना त्यांची अकादमी स्थापन करण्यास सांगितले पाहिजे. भारतात फुटबॉलमध्ये भरपूर कौशल्य आहे आणि भविष्यात दर्जेदार फुटबॉलपटू देशात असतील, असे खासदार प्रसून बॅनर्जी शेवटी म्हणाले.