नवी दिल्ली
भारतीय फुटबॉलच्या विकास धोरणाला ओडिशा शासनाने आपला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे तसेच देशातील तमाम फुटबॉलपटूंकडून ओडिशा शासनाचे कौतुक करण्यात आले आहे.
2018 साली अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने ओडिशा राज्यात प्रवेश केला त्यानंतर या राज्यामध्ये 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटातील अनेक फुटबॉल संघ निर्माण झाले. इंडियन ऍरोज तसेच वरिष्ठांच्या महिला फुटबॉल संघाच्या विकासासाठी ओडिशा शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. देशातील फुटबॉल विकासाच्या धोरणाला ओडिशा शासनाकडून मिळालेल्या सहकार्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे ओडिशा शासनाचे आभार मानण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस कुशल दास यांनी दिली. 2018-19 च्या आय लिग फुटबॉल हंगामात इंडियन ऍरोज संघाला भुवनेश्वरचे कलिंगा स्टेडियम उपलब्ध झाले. ओडिशाने हिरो सुपर चषक तसेच गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हिरो गोल्ड चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते. आगामी फिफाच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे.