वृत्तसंस्था/ पणजी
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने युवा फुटबॉलपटू अन्वर अलीला फुटबॉल ऐवजी दुसरी पर्यायी ऑफर दिली आहे. स्पर्धात्मक फुटबॉल क्षेत्रात यापुढे खेळण्याची अन्वर अलीची शक्यता कमी आहे. त्यामुळे फुटबॉल फेडरेशनतर्फे फुटबॉल क्षेत्रात प्रशिक्षक किंवा प्रशासकीय जबाबदारी स्वीकारण्याचे पर्याय अन्वरसमोर ठेवण्यात आले आहेत.
2017 साली भारतात झालेल्या फिफाच्या 17 खालील वयोगटाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या भारताच्या मोहिमेमध्ये अन्वर अलीचा वाटा महत्त्वाचा ठरला. त्याला जन्मापासूनच हृदयाची समस्या असल्याने स्पर्धात्मक फुटबॉलच नव्हे तर फुटबॉलचा सराव देखील करणे धोक्याचे ठरणार आहे. आशिया फुटबॉल कॉन्फेडरेशन व अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या वैद्यकीय समितीने अन्वर अलीला स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये खेळण्यास परवानगी दिलेली नाही. त्याऐवजी त्याने फुटबॉल प्रशिक्षण किंवा प्रशासकीय जबाबदारी स्वीकारावी, अशी त्याला सूचना केली आहे. आता त्याच्याकडून होकाराची फेडरेशन वाट पहात आहे.