मडगाव : 2021 मध्ये होणारी फिफा यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा आणि 2020 मध्ये होणाऱया एएफसी यू-16 चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या भारतीय महिला संघांचे शिबिर गोव्यामध्ये आयोजित केले जाणार असून या महिन्यातच त्याची सुरुवात होणार आहे.
कोरोना व्हायरस महामारीच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्वच खेळ गेल्या मार्चपासून ठप्प झाले आहेत. आता हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर सरावाला सुरुवात करण्यात येत आहे. ऍथलीट्स व वेटलिफ्टर्स यांचा सराव पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा केंद्रात तर हॉकीपटूंचे सराव शिबिर बेंगळूरमधील साई केंद्रात सुरू करण्यात आले आहे. कोव्हिड 19 चाचणी आणि क्वारन्टाईनच्या प्रक्रियेतून सर्वप्रथम कनिष्ठ फुटबॉल संघांना जावे लागणार आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनदेखील आपल्या खेळाडूंना पुन्हा मैदानावर आणण्यास उत्सुक झाले असून कोरोना दिशानिर्देशामध्ये थोडीशी शिथिलता असल्यामुळे त्यांनी गोव्याची यासाठी निवड केली आहे.