वृत्त संस्था/ माले
आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम करणारे ब्राझीलचे ‘फुटबॉल सम्राट’ पेले यांच्या विक्रमाशी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने बरोबरी साधली. छेत्रीने या सामन्यात आपला 77 वा गोल नेंदवला. रविवारी येथे झालेल्या सॅफ फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भारताने नेपाळचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. कर्णधार छेत्रीने या सामन्यात एकमेव निर्णायक गोल केला.
37 वर्षीय सुनील छेत्रीचा हा 123 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. सॅफ फुटबॉल स्पर्धेत रविवारी नेपाळविरूद्ध 83 व्या मिनिटाला छेत्रीने भारताचा एकमेव निर्णायक गोल केला. या गोलामुळे भारतीय फुटबॉल संघाने सॅफ स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. ब्राझीलच्या पेले यांनी आपल्या कारकीर्दीत 92 सामन्यात 77 गोल नोंदविण्याचा विश्वविक्रम केला होता. आता छेत्रीने आपल्या 123 व्या सामन्यात 77 गोल नोंदविले आहेत. सर्वाधिक गोल नोंदविणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 112 गोलांसह पहिल्या स्थानावर तर अर्जेंटिनाचा कर्णधार लायोनेल मेसी 79 गोलांसह दुसऱया स्थानावर आहे. ब्राझीलचे पेले, संयुक्त अरब अमिरातचा फुटबॉलपटू अली माबखोत आणि सुनील छेत्री हे संयुक्त तिसऱया स्थानावर आहेत.
रविवारच्या सामन्यात नेपाळचा खेळ दर्जेदार, वेगवान झाल्याने मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. भारतीय संघातील बदली खेळाडू फारूख चौधरीने हेडरद्वारे पास छेत्रीकडे सोपविला. छेत्रीने 6 यार्ड अंतरावरून उजव्या बगलेतून नेपाळचा गोलरक्षक किरणला हुलकावणी देत शानदार गोल नोंदविला. आतापर्यंत सातवेळा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकणारा भारतीय संघ आता गुणतक्त्यांत 3 सामन्यांतून 5 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.
5 संघांच्या या गुणतक्त्यात मालदीव 3 सामन्यांतून 6 गुणांसह पहिल्या तर नेपाळ तीन सामन्यातून 6 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. गोल सरासरीच्या जोरावर मालदीवने नेपाळला मागे टाकले आहे. या स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला येत्या बुधवारी यजमान मालदीव विरूद्ध होणाऱया राऊंड रॉबिन गटातील शेवटच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. नेपाळबरोबरचा सामना बरोबरीत राखला असता तर भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला 1-1 तर दुसऱया सामन्यात लंकेला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. यापूर्वी झालेल्या एका सामन्यात भारताने नेपाळवर 2-0 असा विजय मिळविला होता.