कट्टर धार्मिकता ठरली चिंतेचे कारण
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामिक विघटनवादाशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. फ्रान्समधील मुस्लिम समुदायांमध्ये फुटिरवाद वाढणे धोक्याची बाब आहे. इस्लामिक फुटिरवाद हाताळण्याची तरतूद असलेले एक विधेयक पुढील वर्षाच्या प्रारंभी संसदेत मांडले जाणार असल्याचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी सांगितले आहे.
सर्वसाधारणपणे हा कट्टरवाद अहिंसक असतो असे फ्रान्सच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. मुस्लीम पुरुषांकडून महिलांशी हस्तांदोलन करण्यास नकार, महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळय़ा वेळी खुले असणारे जलतरण तलाव, 4 वर्षांच्या मुलींचाही चेहरा झाकणे आणि मदरशांच्या विस्तारीकरणाचे उदाहरण सरकारने दिले आहे.
इस्लामिक फुटिरवादाशी लढण्याची गरज आहे. देशाच्या कायद्यापेक्षा स्वतःला वरचढ मानणाऱया विचारसरणीवर आमचा आक्षेप आहे. फ्रान्समध्ये अरबी भाषा शिकविण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
250 पेक्षा अधिक बळी
फ्रान्समध्ये मागील 5 वर्षांमध्ये इस्लामिक उग्रवाद किंवा दहशतवादी गटांनी प्रभावित लोकांच्या हल्ल्यात 250 पेक्षा अधिक जण मारले गेले आहेत. तर 2 वर्षांनी फ्रान्समध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन विरोधकांना स्वतःवर टीका करण्याची संधी देऊ इच्छित नाहीत. उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी गुन्हे आणि स्थलांतराप्रकरणी कठोर भूमिका अवलंबिली आहे. या पक्षांना धर्मनिरपेक्षतेसंबंधी देशात कठोर कायदा लागू करायचा आहे.