13 लाख चौरसमीटरमध्ये 6 कोटी फुले , दुबईचा माळी हेलिकॉप्टरमधून करतो पाहणी
सध्याच्या दिवसांमध्ये पूर्ण दुबई शहर फुलांनी बहरलेले दिसून येते. शहरात कुठेही गेला तरीही फुलांचा ताटवा दिसून येणार आहे. दुबई प्रशासनानुसार 13 लाख चौरस मीटर क्षेत्रात 5.7 कोटी फुले फुलली आहेत. रस्त्यांवर फुलझाडांची लागवड करण्यासाठी कलर सायकोलॉजी (रंग विषयक मानसिकता)ची काळजी घेतली जाते.
उदाहरणार्थ अधिक वाहतूक असलेल्या रस्त्यांवर शांत, सुखद आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱया रंगाची फुले लावली जातात. या फुलांच्या मदतीने वाहतूक कोंडीतून निर्माण होणारा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. माळय़ांचे पथक या बगीच्यांची देखभाल करते. अनेक माळय़ांना हेलिकॉप्टरद्वारे शहर दाखविले जाते. यातून त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ पाहता येते.
1971 पासून परंपरा
1971 मध्ये संयुक्त अरब अमिरात हा देश स्थापन झाला. त्याचवर्षी शेख जायेद आणि शेख राशिद या शासकांनी नव्या देशाला हिरवेगार स्वरुप देण्याचा निर्धार केला होता. तेव्हापासूनच दुबई तसेच अन्य शहरांमध्ये हिरवाई वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा दुबईत पेटूनिया, सदाबहार, जीनिया, साल्विया, स्नॅपड्रगन इत्यादी प्रकारची फुले बहरली आहेत.