प्रतिनिधी / कोल्हापूर
फुलेवाडी दत्तमंदिरच्या पिछाडीस असणाऱ्या महानगरपालिकेच्या महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानाला न्यूझीलंडमधील मैदानासारखा लूक लाभला आहे. तब्बल चाळीस लाखाहून अधिक निधी खर्चुन पूर्वी हे मैदान विकसित करण्यात आले आहे. हिरव्यागार मैदानावर फुटबॉल, क्रिकेटसह ऍथलेटिक्सच्या खेळाडूंना लाभ होणार आहे. त्याचबरोबर डे-नाईट सामने आयोजित करता येणार आहेत. त्यासाठी फ्लडलाईटचीही (कृत्रिम प्रकाशझोत) व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात विशेष म्हणजे मुंबईतील जगप्रसिद्ध वानखेडे क्रिकेट स्टेडियमवरील हिरवेगार गवत अर्थात लॉन फुलेवाडीच्या या मैदानावर लावण्यात आले आहे. याआधी हार्ड रॉक असणाऱया आणि डबक्यासारखा भागात असणाऱ्या या मैदानाचे सौदर्य लॉनरूप ग्रीन कार्पेटने आणखीन खुलले आहे.
फुलेवाडीसह परिसरातील फुटबॉलपटूंच्या दोन तीन पिढ्या या महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर तयार झाल्या. उपनगरातील पहिला फुटबॉल संघ म्हणून फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाच्या रूपाने कोल्हापुरी फुटबॉलमध्ये प्रवेश केला. या गोष्टीला दोन तीन दशके लोटली. त्याचबरोबर टेनिस आणि लेदरबॉल क्रिकेटमधील क्रिकेटपटूही याच मैदानावर तयार झाले. पूर्वी या मैदानाची स्थितीही बिकट होती. खडकाळ, जमिनीपासून खाली असलेल्या या मैदानावर खेळताना पडल्याने अनेक खेळाडू जखमी झाले. फुटबॉलचा सराव असो वा क्रिकेटचा सराव असो वा सामने असो खेळाडूंची खेळताना कसरत होत असे. त्यातून जखमी होऊनही खेळाडू घडत गेले. अनेकांना गंभीर जखमांमुळे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
एकीकडे फुलेवाडी परिसरातील खेळाडूंसाठी वरदान ठरलेल्या या मैदानाला भरून घेऊन सुसज्ज करण्याची मागणी खेळाडूंससह संध्याकाळी फिरण्यासाठी, व्यायामासाठी येणाऱया नागरिकांतूनही होऊ लागली. तत्कालिन स्थानिक नगरसेवक राहुल माने यांनी पुढाकार घेऊन मैदान विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यातून गेल्या दोन वर्षात मैदानाचे रूपडे पालटले आहे.
असे झाले मैदान तयार
दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये मैदानाच्या विकसनाला प्रारंभ झाला. तब्बल 7 ते 8 फुट मैदान खोदण्यात आले. त्यातील हार्ड रॉक अर्थात खडक खोदून काढण्यात आला. त्यानंतर मुरूम, मातीचे थर टाकत मैदान भरून घेण्यात आले. सरासरी चार ते पाच फूट मैदान भरून घेतल्यानंतर त्याची लेव्हल करण्यात आली. जून 2020 मध्ये मैदानावर हिरवळ लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. 2019 मध्ये अतिवृष्टी आणि 2020 मध्ये कोरोनाचे संकट यामुळे कामात काहीसा व्यत्यय आला. पण त्यातून मार्ग काढत काम पूर्ण करण्यात आले. मुंबईच्या जगप्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवरून तेथील बरमुडा पद्धतीचे लॉन अर्थात गवत आणण्यात आले. ते मैदानावर लावण्यात आले. त्याला दररोज पाणी देऊन ते विकसित केले गेले. तब्बल सहा ते सात इंच या गवताची मुळे मैदानाच्या खाली गेली आहे. गवताचे कटिंगही केले जात आहे. मैदान सज्ज झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर तेथे खेळाडूंनी खेळही सुरू केला आहे. फुटबॉलबरोबर क्रिकेटसाठीही खेळपट्टी तयार केली आहे. मैदानावर रात्रीच्या वेळी सामने घेता यावेत यासाठी राहुल माने यांनी फ्लडलाईटची सुविधा केली आहे. दहा विद्युत खांब उभारण्यात येणार आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत मैदानाचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात येणार आहे.
मैदानावर दृष्टीक्षेप मैदानाचा आकार 65 मीटर बाय 43 मीटरया खेळांसाठी उपयुक्त फुटबॉल, क्रिकेट व ऍथलेटिक्स प्रकाश योजना प्रकाशझोतासाठी दहा विद्युत खांब अंदाजे खर्च चाळीस लाख रूपये निधी मिळाला महापालिका आणि पालकमंत्री सतेज पाटील मैदानाला फुलेवाडीचे नाव मैदानाला फुलेवाडी क्रीडांगण किंवा फुलेवाडी पॅव्हेलियन असे नाव देऊन फुलेवाडी भागाची क्रीडा परंपरा पुढे नेण्यात येणार आहे. फुलेवाडीसह आसपासच्या कॉलनीतील खेळाडूंना लाभ फुलेवाडी परिसरातील विविध कॉलनींसह लक्षतीर्थ, बलराम कॉलनीतील खेळाडूंना या मैदानाचा लाभ होणार आहे. सध्या फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचे खेळाडू या मैदानावर सराव करतात. त्याचबरोबर भागातील मुलेही लाभ घेतात. |
आता बिनधास्त डाईव्ह मारा! पूर्वी खडकाळ असलेल्या या मैदानावर पडल्यानंतर खेळाडू जमखी होत असत. पण आता या मैदानावर क्रिकेटमधील जाँटी ऱ्होडसारखा डाईव्ह मारला तरी जखमी होणार नाही, इतके या मैदानावरील ग्रीन कार्पेट सुखावणारे आहे. |
पूर्वी फुलेवाडी मैदानाची अवस्था बिकट होती, जखमी होण्याचा धोका असूनही परिसरातील खेळाडू जीव तोडून सराव करत होते, कष्ट करत होते. आता नवीन हिरव्यागार मैदानावर सरावाचा, खेळाचा आनंद लुटण्यास, अव्वल खेळाडू घडण्यास मदत होणार आहे. -राहुल माने, माजी नगरसेवक |