पुणे / प्रतिनिधी :
सजवलेले रथ, लेझीम आणि ढोल पथक यासाह फुले विचारांचे फलक घेऊन भव्य रॅलीत सहभागी झालेल्या फुले विचार समर्थकांनी केलेल्या जयघोषामुळे पुण्यनगरी दुमदमून गेली.
निमित्त होते १ जानेवारीच्या ‘फुले दांपत्य सन्मान दिवसा’निमित्त समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव समितीर्फे आज काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगतीपथावर नेत आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी हा दिवस यंदा देखील ‘फुले दांपत्य सन्मान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.
भिडे वाडा येथून निघालेल्या या भव्य रॅलीत कमलातई ढोले-पाटील, अश्विनी कदम, माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, रॅलीचे मुख्य संयोजक डि.के.माळी,महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विकास रासकर, मोहन जोशी, नगरसेवक मनीषा लडकत, गायत्री लडकत, संगीता देवलकर, संगीता अंतरे, देवयानी फरांदे, संदीप लडकत, मधुकर राऊत, सुधीर पैठणकर, शारदा लडकत, शैलाताई दुधाणे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक-प्रसारक अशा हजारो समविचारी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलिस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलिस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडे आली. तिथून फुले वाड्यावर आलेल्या या रॅलीचे रूपांतर भव्य सभेत झाले. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी गंजपेठ येथील पुणे महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन केले.