कंपनीच्या समभागात मात्र 5 टक्क्यांची वाढ- सर्वात मोठय़ा आयपीओमुळे कंपनी चर्चेत
वृत्तसंस्था/ मुंबई
गेल्या जुलै महिन्यात विविध कंपन्यांनी बाजारात इनिशिअल पब्लिक ऑफर (आयीओ) आणले होते. यामध्ये सर्वाधिक चर्चेत अन्न पुरवठा करणारी कंपनी झोमॅटो राहिली आहे. सर्वात मोठा आयपीओ म्हणूनही सदरची कंपनी मोठय़ा प्रमाणात चर्चेत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. या सर्व घडमोडींनंतर कंपनीचा तोटा वाढल्याच्या वातावरणातही झोमॅटोचे समभाग जवळपास 5 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.
जेफरीज यांनी झोमॅटोवर खरेदीची संधी दिली होती. ब्रोकरेज हाऊसने समभागाचे ध्येय 175 रुपये केले होते. आर्थिक वर्ष 22 ते 24 साठी महसूल अंदाज 10 ते 20 टक्क्यांनी वाढीव वर्तवला आहे.
कमाईसोबत तोटा
कंपनीचा तोटा एप्रिल ते जून दरम्यान 256 टक्क्यांनी वाढून 356.2 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. जो मागच्या वर्षातील समान तिमाहीत 99.8 कोटी रुपये होता. एप्रिल ते जून या कालावधीत झोमॅटोचे एकूण उत्पन्न 844.4 कोटी रुपयांवर पोहचले आहे, जे मागच्या वर्षातील समान कालावधीत 266 कोटी रुपये होते.