कलाकारांनीही आपल्या वाढत्या फॉलोअर्सचा उपयोग समाजाला कसा होईल हे ओळखलं आहे. सध्याच्या कोरोनाकाळात जागृती करण्यासाठी अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. यामध्ये अभिनेत्री गायत्री दातार हिनेही तिच्या फॅनफॉलोइंगचा वापर समाजजागृतीसाठी केला आहे. कोरोनाबाबत काय काळजी, घ्यावी, लसीकरण, आहार, व्यायाम याबाबत ती तिच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट करत आहे. माझ्या पेजवरून अधिकृत व उपयुक्त माहिती माझ्या लाखो फॉलोअर्सपर्यंत पोहोचली आणि त्यातील काहीजणांना जरी त्याचा उपयोग झाला तरी मला आनंद होईल असंही गायत्री सांगते.
तुला पाहते रे, या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण करुन लोकप्रियता मिळवलेल्या गायत्री दातारचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या ‘ती चला हवा येऊ द्या’या शोमध्ये विनोदी पंच मारताना दिसत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मराठी मालिका, शोज चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेर गेले. सध्या गायत्री शूटिंगच्या निमित्ताने जयपूर येथे आहे. कोरोनाचा कहर आणि अजूनही लोकांची बेफिकीरी यावरही गायत्रीने भाष्य केले आहे. गायत्रीला व्यायामाची आवड आहे. या आवडीतूनच तिने व्यायामाची अधिकृत माहितीही संकलित केली आहे. शिवाय गायत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मला काय मदत करता येईल असा विचार करत असताना गायत्रीला ही कल्पना सुचली.
गायत्री सांगते, आम्ही कलाकार सोशल मीडियावर आमचा एक फोटो पोस्ट करतो. तेव्हा त्याला हजारो लाइक्स येतात, लाखो ह्यूज मिळतात. आजपर्यंत मी देखील अनेक फोटो, व्हिडिओ, ऑफक्रिन धमालचे किस्से पोस्ट केले आहेत. आमचे चाहते आम्हाला सतत फॉलो करत असतात. आम्ही काय पोस्ट केले आहे याकडे त्यांचे लक्ष असते. मग याच लोकप्रियतेचा उपयोग सध्याच्या कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या काळात जर चांगल्या प्रकारे करता आला तर असा विचार माझ्या मनात आला. मी उत्तम व्यायाम करते, मग त्याबाबतच्या टिप्स जर मी माझ्या सोशल मीडिया पेजवरून दिल्या तर त्या लाखो लोकापर्यंत माझ्या फॉलोअर्सच्या माध्यमातून पोहोचतील याची मला खात्री होती. सध्या मी कोरोनाची लागण झालेल्यांनी कोणते व्यायाम करावेत याच्या टिप्स देत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी जितकी औषधे महत्त्वाची आहेत, जितका आहार महत्त्वाचा आहे तितकाच व्यायामही महत्वाचा आहे. त्यासाठीच मी या टिप्स देत आहे. हा उपक्रम सुरू केल्यावर मला अनेकांकडून प्रतिक्रिया आल्या, कौतुकही झाले. मी डॉक्टर नाही, पोलिस नाही, याचा अर्थ मी कोरोनायोद्धा होऊ शकत नाही का हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. मी तो स्वतःला विचारला तेव्हा मला उत्तर मिळाले की, जे तुझ्याकडे आहे ते तू लोकांना माहितीच्या स्वरूपात दे. आजपर्यंत मी सोशलमिडियावर खूप पोस्ट केल्या. पण आता कोरोनाग्रस्तांना व्यायामाची माहिती देणाया पोस्ट करताना मला जो आनंद व समाधान मिळत आहे त्याला तोड नाही.