स्वतः डिझाइन करून शिवून घालते कपडे, लाखोंच्या संख्येत आहेत चाहते
माणसाची गुणवत्ता कमी वयातच दिसू लागते. काही असेच कलात्मक कौशल्य अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये राहणाऱया काइया एरागोनमध्ये आढळून आले आहे. वयाच्या केवळ 9 व्या वर्षी काइया अत्यंत सुंदर कपडे स्वतः शिवून तयार करते. इयत्ता तिसरीत शिकणाऱया काइयाचे लाखो चाहते असून तिने तयार केलेले कपडे अनेक मोठमोठय़ा ब्रँड्सना टक्कर देणारे आहेत.
4 वर्षांची असल्यापासून काइयाला कपडे डिझाइन करण्याचा शिलाईचा छंद होतो. वर्षभरापूर्वी तिच्या आईने तिला शिवणयंत्र दिले होते, तेव्हापासून ती स्वतःसाठी सातत्याने कपडे शिवत आहे.
फॅशन डिझाइन होण्याचे स्वप्न तिने आतापासूनच बाळगले आहे. स्वतःची फॅशन कंपनी असावी अशी तिची इच्छा आहे. सध्या ती स्वतःसाठी कपडे तयार करते आणि लोक तिच्या डिझाइन्सला सोशल मीडियावर पसंती देत आहेत.
काइयाची आई टोन्या स्वतःच्य मुलीने तयार केलेल्या ड्रेसेसना टिकटॉकवर शेअर करते, याला लाखो लोकांची पसंती मिळते. एवढेच नव्हे तर लोक हे कपडे खरेदी करण्यास इच्छुक असतात, परंतु काइयाची आई सध्या याला केवळ मुलीचा छंदच राहू देऊ इच्छिते.
माझ्या मुलीला स्टायलिश राहणे कमी वयापासूनच पसंत होते. घरात राहून शिक्षण घेणाऱया काइया स्वतःच्या खेळण्यांसाठी कपडे शिवायची. तिचा छंद पाहून तिला शिवणयंत्र दिले. काइया आता सोशल मीडियावर स्वतःच्या डिझाइयर ड्रेसेसमुळे स्टार झाल्याचे टोन्या यांनी सांगितले.
टिकटॉकवर काइयाचे 5 लाख 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या कपडय़ांना आयकॉनिक डिझायनर वेरा वांग यांनी पसंती दर्शविली असून तिच्यासाठी विशेष भेटवस्तू देखील पाठविली. काइया गोष्टींना कम्बाइन करणे आणि त्यापासून काही वेगळे काही तयार करण्यात पारंगत आहे. तिने स्वतःच्या आईच्या जुन्या कपडय़ांपासूनही डिझाइन्स तयार केल्या आहेत.
काइयाला सध्या कपडे तयार करण्यास केवळ एक तास लागतो. ती स्वतःच्या स्केचबुक्समध्ये डिझाइन तयार करून ठेवते. स्वतःच्या मुलीचे काम करतानाचे व्हिडिओ टान्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.