11 राज्यांचा सहभाग, मुलींच्या गटात कर्नाटकाला दुसरे उपजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रामगुंडम-तेलंगण येथे सिंगरानी हायस्कूलमध्ये आयोजित ऑल इंडिया निमंत्रितांच्या फेडरेशन चषक चेस्टोबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात कर्नाटक संघाने उत्तर प्रदेश संघाचा 48-28 गुणांनी पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या गटात कर्नाटक संघाला दुसऱया उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. या चेस्टोबॉल स्पर्धेत एकूण 11 राज्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, मुंबई, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगण, केरळा, छत्तीसगड, प. बंगाल व चंदीगडचा समावेश होता.
या स्पर्धेत मुलांच्या संघात कर्नाटक संघाने सर्व साखळी सामन्यात विजय संपादन करून सर्वाधिक गुण मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. उपांत्य फेरीत कर्नाटक संघाने आंध्र प्रदेश संघाचा तर उत्तरप्रदेश संघाने तेलंगणचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत कर्नाटक संघाने उत्तर प्रदेश संघाचा 48-28 गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. कर्नाटक संघात रोनित पवार, ओंकार गुरव, सौरव मुतगेकर यांचा समावेश होता.
मुलींच्या गटात कर्नाटक संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पण बलाढय़ आंध्रप्रदेश संघाविरुद्ध कर्नाटक संघाला पराभवास सामोरे जावे लागले. या संघात नम्रता कामू, श्रेया गोणी, संजना शिंदे व उत्तरा चव्हाण यांचा समावेश आहे. कर्नाटक संघास गोगटे महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक अमित जडे यांचे मार्गदर्शन लाभले.