अन्नधान्य-इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम ः सलग अकराव्या महिन्यात दुहेरी अंकात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अन्नधान्याच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे होलसेल प्राईस इंडेक्स म्हणजे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईदर फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्क्मयांवर पोहोचल्याची माहिती सोमवारी सरकारकडून देण्यात आली. एप्रिल 2021 पासून सलग अकराव्या महिन्यात घाऊक महागाईदर दुहेरी अंकात राहिला आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई 12.96 टक्के होती तर डिसेंबर 2021 मध्ये ती 13.56 टक्के इतका होता.
कोरोना महामारीच्या संकटापासून महागाईमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसत आहे. मुख्यतः खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ आणि गैर-खाद्य वस्तू इत्यादींच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे फेब्रुवारी 2022 मधील महागाईचा दर वाढल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
फेब्रुवारीमध्ये खाद्यपदार्थांशी निगडीत महागाई 8.19 टक्क्यांवर आली आहे. हा दर आधीच्या महिन्यातील 10.33 टक्केंच्या वाढीपेक्षा कमी आहे. तसेच भाज्यांच्या किंमतीमध्येही 26.93 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यापूर्वी भाज्यांचा महागाईदर डिसेंबरमध्ये 31.56 टक्के आणि जानेवारीत 38.45 टक्के इतका होता. कांद्याच्या घाऊक किंमती 26.37 टक्क्यांनी घसरल्या तर बटाटय़ाच्या किमतीत 14.78 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. तसेच अंडी, मांस आणि मासे यांच्या किंमती 8.14 टक्क्यांनी वाढल्या असून गव्हाच्या किंमती 11.03 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जानेवारी महिन्यात देशातील किरकोळ चलनवाढीचा दर सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई 6.01 टक्के होती, जी गेल्या 7 महिन्यांतील सर्वोच्च आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 5.59 टक्के होता.