एकूण 251 अपघातांची नोंद
प्रतिनिधी /पणजी
फेब्रुवारी 2022 या महिन्यात गोव्यात एकूण 251 अपघातांची नोंद झाली असून त्यातील बळी घेणारे 21 अपघात होते तर एकूण 21 जणांचा अंत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात उत्तर गोव्यात 7 तर दक्षिण गोव्यातील 14 जणांचा समावेश आहे.
वाहतूक खात्याच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 15 दुचाकीस्वार, दोन मागे बसलेले, 3 पादचारी व 1 प्रवासी यांचा अंतर्भाव आहे.
गंभीरपणे जखमी होणारे 14 अपघात झाले असून ते उत्तर-दक्षिण गोव्यात प्रत्येकी 7 आहेत. दोन्ही जिल्हय़ात मिळून 41 किरकोळ अपघात झाले असून उत्तर गोव्यात 18 तर दक्षिण गोव्यात 23 जणांचा समावेश आहे. कोणीही जखमी न होणारे व फक्त वाहने एकमेकांना लागून सुमारे 175 अपघात घडले. त्यात उत्तर गोव्यात 97 तर दक्षिण गोव्यात 78 अपघातांचा अंतर्भाव आहे.
उपरोक्त अपघातात 20 जण गंभीर जखमी झाले. त्यात उत्तर गोव्यातील 7 तर दक्षिण गोव्यातील 13 जणांचा समावेश आहे. एकूण 69 जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यात उत्तर गोव्यातील 30 तर दक्षिण गोव्यातील 39 जण आहेत.
नियम मोडणाऱया 1740 जणांना दंड फेब्रुवारी 2022 मध्ये वाहतूक नियम मोडले म्हणून एकूण 1740 जणांना दंड देण्यात आला असून त्यांची वसुली सध्या चालू आहे. फेब्रुवारी महिन्याची आकडेवारी पाहिली तर गोव्यात अपघाताचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. वेगाने वाहने चालवणे, वाहतूक नियम न पाळणे तसेच हेल्मेट न घालणे अशी अनेक कारणे अपघात होण्यासाठी असल्याचे समोर आले आहे. आता वाहतूक नियमात जबर दंडाची तरतूद करण्यात आल्यामुळे अपघात कमी होतील, अशी अपेक्षा आहे.