नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील बँक कर्मचारी पुन्हा एकदा 23 आणि 24 फेब्रुवारीला संपावर जाणार आहेत. सेंट्रल टेड युनियन्स (सीटीयू) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनसह (एआयबीईए) इतर संघटनांनी संयुक्तपणे बँक संपाची घोषणा केली आहे. देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. ‘एआयबीईए’चे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सर्व बँक संघटना आणि सदस्यांना निवेदन जारी करत संपात सहभागी होण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.
23 आणि 24 फेब्रुवारीला बँक कर्मचारी संपावर गेल्यास 23 ते 27 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच 5 दिवसांपैकी 4 दिवस बँकांमधील कामकाज ठप्प राहणार आहे. 23 आणि 24 रोजी संपामुळे आणि 26-27 फेब्रुवारीला अनुक्रमे चौथा शनिवार व रविवार असल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी संभवू शकतात. 25 फेब्रुवारीला (शुक्रवारी) बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी बँक संघटनांनी गेल्या महिन्यात 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप केला होता. त्यानंतर बँक संपाचा परिणाम एसबीआय, पीएनबी, सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर झाला. यादरम्यान चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्स्फर, डेबिट कार्ड यासंबंधीचे कामही रखडले होते.