पुलाची शिरोली / वार्ताहर
शिये फाटा येथील संतप्त फेरीवाल्यांनी औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात कॉ. गिरीष फोंडे यांच्या नेतृत्वाखाली लोटांगण घालत आंदोलन केले. त्यामुळे महामंडळाच्या अधिकार्यांनी कंपाउंडचे काम तात्पुरते थांबवले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने शिये फाटा येथील अतिक्रमणावर गुरुवारी कारवाई केली. फेरीवाले पुन्हा तेथे अतिक्रमण करणार नाहीत, यासाठी तारांचे कंपाउंड घालण्याचे काम सुरु केले होते. यामुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातच शुक्रवारी लोटांगण घातले. कंपाउंडचे काम थांबवणार नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका फेरीवाल्यांनी घेतल्याने महामंडळाच्या अधिकार्यांनी कंपाउंडचे काम अखेर थांबवले. प्रशासन आणि फेरीवाले यांच्यात सोमवारी दुपारी बैठक होईल. तोपर्यंत कंपाउंड करणार नसल्याचं औद्योगिक विकास महामंडळाचे उप.अभियंता आय. ए. नाईक यांनी सांगितले. बैठकीत योग्य मार्ग न निघाल्यास महामंडळाच्या दारात आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी फेरीवाल्यांनी दिला.
शिये फाटा हा चौक महामार्गाकडे आणि कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी सोईस्कर समजला जातो. शियेमार्गे तिर्थक्षेत्र जोतिबा आणि पन्हाळा येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. त्यामुळे या चौकात काही व्यवसायिकांनी लहान मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अतिक्रमणावर कारवाई केली. फेरीवाल्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढून घ्यावे. अशा सूचना केल्या असल्याने फेरीवाल्यांनी आपली दुकाने स्वतःहून काढली होती. मात्र आज महामंडळाच्यावतीने शिये फाटा येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कंपाउंड घालण्याचे काम सुरु केले. त्यामुळे संतप्त फेरीवाल्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात धाव घेतली. फेरीवाल्यांनी कार्यालयातच ठिय्या मारत लोटांगण घातले. यावेळी फेरीवाले आणि अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून फेरीवाल्यांची समजूत काढली. यावेळी गिरीश फोंडे, मौला नदाफ, भाऊ कारंडे, फिरोज नदाफ, विकास मिणेकर, गोरक्षनाथ सुतार आदी सह फेरीवाले उपस्थित होते.