आरोग्य तज्ञांशी चर्चा करुन निर्णय : अन्य सुविधा देण्याचीही घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील चार पाच महिन्यांपासून देशातील उद्योगधंद्यांसोबत जगातील व्यवसायाची रणनिती मोठय़ा प्रमाणात बदलत आहे. कोविडच्या महामारीमध्ये काही कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करत आहेत तर काहीजणांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णयही कंपन्यांनी घेतल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये जगातील दिग्गज सोशल मीडीया कंपनी फेसबुकचाही समावेश होत असून कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना जुलै 2021 पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची सवलत दिली आहे.
फेसबुकने वर्क फ्रॉम होमसोबत आपल्या समूहाला 75,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या अगोदरपासून गुगल आणि ट्विटरनेही कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
कंपनीने आरोग्य तज्ञ आणि सरकारी विशेष तज्ञांचा सल्ला घेत कार्यालयात बैठक घेऊन चर्चा केली आणि त्यात हा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रवक्ते नॉर्विल यांनी दिली आहे. यामध्ये जुलै 2021 पर्यंत आपल्या इच्छेनुसार कर्मचाऱयांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच आवश्यकता लक्षात घेत गरजूंना 1,000 डॉलर्सची रक्कम देण्याचा विचार केला आहे.
मार्चपासूनच वर्क फ्रॉम होम
फेसबुकच्या एकूण कर्मचाऱयांपैकी जवळपास 48,000 कर्मचारी मार्च महिन्यापासून घरातून काम करत असून हीच सुविधा चालू वर्षाच्या अंतिमपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा कंपनीने केली आहे. नवीन निर्णयानुसार आगामी जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होममध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दहा वर्षांसाठी वर्क फ्रॉम होम?
आगामी पाच ते दहा वर्षासाठी निम्म्या कर्मचाऱयांना कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम करण्यास संधी उपलब्ध करुन देण्याचा विचार असल्याचे फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी मार्चमध्ये एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.