मलकापुरातील प्रेमवीर युवकावर मुंबईत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
प्रतिनिधी/ कराड
फेसबुकवर अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. फेसबुकवरील चॅटिंगने ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. जिच्यासोबत सूत जुळले ती मुलगी मुलासह मलकापुरात आली. मात्र अल्पवयीन असल्याने पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागला आणि फेसबुकवरील प्रेमाची वरात मुंबई पोलिसांच्या दारात पोहोचली. मलकापूर (ता. कराड) येथील युवकावर बाललैंगिक अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
मलकापूर येथील विवाहित युवकाने फेसबुकवरून अनेक मुलींशी सलगी केली होती. मुंबईतील एका सतरा वर्षीय मुलीशीही त्याची फेसबुकवरून ओळख झाली. दोघांचे वैयक्तिक चॅटिंग सुरू झाले. यातून दोघांचे सूत जुळले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या गेल्या, भेटायचे ठरले. मलकापूरचा मुलगा मुलीला भेटायला मुंबईला गेला. फोटोत दिसणारा मुलाचा चेहरा आणि प्रत्यक्षात दिसणारा चेहरा कमालीचा वेगळा असला तरीही मुलीला तो आवडला. तिने प्रेमाच्या धुंदीत आई वडिलांना सोडले, घर सोडले, मुंबई सोडून कराडात आली. हा धक्का सहन न झालेल्या आई वडिलांनी मुंबई पोलिसांत अपहरणाची फिर्याद दिली.
तपासाची चक्रे दोन दिवसात कराडपर्यंत पोहोचली. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी निर्भया पथकाला त्या प्रेमवीराला ताब्यात घेण्यासाठी पाठवले. कराड पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाचे हवालदार अतुल देशमुख, महिला पोलीस सोनाली कदम, हवालदार फल्ले यांनी शिताफीने या फेसबुकवरील प्रेमवीराला पोलीस ठाण्यात आणले. मुंबई पोलीसही मुलीच्या आई वडिलांसह कराडात पोहोचले, चौकशी सुरू झाली. पोलिसांनी प्रेमवीरासह सर्वांना मुंबईकडे नेले. या फेसबुकवरील प्रेमवीरावर बाललैंगिक अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला. प्रेमवीर भलताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला. फेसबुकवरून सुरू झालेला हा प्रेमाचा प्रवास मुंबईतील पोलीस ठाण्यात संपुष्टात आला.