माळवाडी येथील रोहित नलवडे याने स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन केली आक्षेपार्ह पोस्ट
वार्ताहर / भिलवडी
महाविकास आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल माळवाडी येथील एकावर भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळवाडी ता.पलूस येथील रोहित शिवाजी नलवडे याने त्याच्या स्वतःच्या नावचे फेसबुक अकाऊंटवरुन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उध्दवजी ठाकरे व खासदार तथा दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या लौकीकास बाधा आणण्याच्या उद्देशाने त्यांना गोंधळ्याचा वेश परिधान करून, सरकार स्थापन झाल्यापासुन एक दिवस चांगला गेला नाही. सर्व चांगले व्हावे यासाठी सोनिया मातेचा गोंधळ घालताना गोंधळी महाभकास आघाडी, महाविनाश आघाडी असे लिहुन फेसबुक या इलेक्ट्रॉनिक माध्यमावरुन पोस्ट तयार करुन महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या नाव लौकिकास बाधा निर्माण होईल असे कृत्य केले आहे.
अशी फिर्याद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलूस तालुका अध्यक्ष मोहन पाटील यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. भिलवडी पोलिसांनी रोहित नलवडे यास नोटीस बजावली असून, त्याचा मोबाईल ही जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार पी. आर. सुतार हे करीत आहेत.समाजामध्ये असंतोष निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करून सामाजिक समतोल बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहित नलवडे यांच्यावर योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पलुस तालुका अध्यक्ष मोहन पाटील, सोशल मिडीया पलूस तालुका उपाध्यक्ष सचिन मगदूम , माजी सरचिटणीस विजय पाटील, महावीर उर्फ गुंडाभाऊ चौगुले , शरद पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र चौगुले, कामगार सेल अध्यक्ष तानाजी मोकाशी यांनी केली आहे.