प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावातील 13 हॉटेलमध्ये संशयितांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. पण यांचा कालावधी पूर्ण झाल्याने मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे हॉटेलच्या खोल्यांच्या शुद्धीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याकरिता महापालिकेने दोन फेमिगेशन फॉगर मशीन खरेदी केली असून, या मशिनद्वारे सर्व हॉटेलच्या खोल्यांचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोरोना रूग्ण आढळल्याने त्यांच्या कुटुंबियांना व संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. तसेच रूग्णांची संख्या वाढत चालल्याने संशयितांचा अकडा देखील वाढू लागला आहे. सर्व संशयितांना होम क्वॉरंटाईन करण्यासाठी बेळगावातील हॉटेल ताब्यात घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शेकडो संशयीतांना 13 हॉटेलमध्ये होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यापैकी 100 हून अधिक संशयीतांचा होम क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची तपासणी करून नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यामुळे हॉटेलमधील खोल्यांचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. याकरिता औषध फवारणी करण्यात येत होती. पण अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याकरिता महापालिकेने दोन फेमिगेशन फॉगर मशीन खरेदी केल्या आहेत. फॉगर मशीन हॉटेलमधील खोलीमध्ये अर्धातास सुरू ठेवावी लागणार असून, फार्मलीन आणि साल्विसाईड लिक्विडची फवारणी या मशीनद्वारे करण्यात येणार आहे. 24 तास सदर खोली बंद ठेवल्यानंतर खोलीचा पुनर्र वापर करता येणार आहे. शुद्धिकरणासाठी या सुविधेचा वापर लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.