वृत्तसंस्था/ वॉशिंग्न
नको असलेले कॉल्स घ्यावे लागणे किंवा नको असलेले संदेश सक्तीने बघावे लागणे ही समस्या प्रत्येक भ्रमणध्वनी धारकाची आहे. आता व्हॉटस्अप या लोकप्रिय ऍपने यावर उपाय शोधला आहे. असे कॉल्स, संदेश किंवा चर्चा कायमच्या बंद करण्याची सोय आता भ्रमणध्वनी धारकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वास्तविक ही सुविधा यापूर्वीच देण्यात आली होती. तथापि, तिचा उपयोग फारसा होत नव्हता. कारण असे कॉल्स किंवा संदेश केवळ मर्यादित काळासाठीच बंद होत असत. पण आता या सुविधेत सुधारणा करून या ऍपने नको असलेले कॉल्स, संदेश आणि चर्चा कायमच्या बंद करण्याची सोय उपलब्ध केली असून ती उपयोगात आणता येऊ शकणारी असल्याचे दिसून आले आहे.
लोकांची मागणी पूर्ण
ही सोय उपलब्ध करून व्हॉटस्अपने आपल्या असंख्य ग्राहकांची मागणी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आहे. नको असलेल्या संदेशांनी हैराण झालेल्या भ्रमणध्वनी धारकांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तथापि, त्यात मोठे अर्थकारण दडलेले असल्याने तिच्याकडे फारसे गांभीर्याने बघितले गेले नाही. मात्र, आता ही सोय देऊन व्हॉटस्अपने ग्राहकांना मोठाच दिलासा दिला आहे, अशी प्रतिकिया अनेकांनी व्यक्त केली आहे.