काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव यांची माहिती : उमेदवारांची पहिली यादी 10 डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी /पणजी
गोवा फॉरवर्ड आणि आम्ही एकत्र आलो असलो तरी युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, फॉरवर्डने आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतरच युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी स्पष्ट केले आहे.
’आमचा गोवा, आमचा जाहीरनामा’ कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी एल्विस गोम्स, ऍड. रमाकांत खलप, सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता, हिमांशू तिवरेकर आणि हशिबा यांची उपस्थिती होती.
राज्यातील लोकांची मते, विचार, मागण्या, अपेक्षा, समस्या, सूचना यांचा सखोल अभ्यास करून तसेच देशात आणि विदेशात राहणाऱया गोमंतकीयांच्यासुद्धा सूचना विचारात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येईल, असे गोम्स यांनी सांगितले. यात अधिक लोकसंपर्क वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून लोकांशी जोडण्यासाठी ई-मेल आयडी, वॉटस्ऍप क्रमांक आणि मिस्ड् कॉल क्रमांक उपलब्ध केले आहेत. त्याशिवाय वेबसाईटही निर्माण करण्यात आली आहे. त्यातूनच ’आमचा गोवा, आमचा जाहीरनामा’ बनविण्यात येणार आहे, असे गोम्स यांनी सांगितले.
उमेदवारांची यादी 10 डिसेंबरपर्यंत
श्री. गुंडूराव यांनी बोलताना, काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी 10 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली. जाहीरनामा बनविण्याचे काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून लवकरच तो जाहीर करण्यात येईल. तत्पूर्वी लोकांची मते, विचार, मागण्या, सूचना, अपेक्षा जाणून घेण्यात येतील व लोकांनी वरील माध्यमातून त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या, असे गुंडूराव यांनी सांगितले. युतीबाबत पुढे बोलताना त्यांनी सध्या तांत्रिकदृष्टय़ा दोन्ही पक्षांची युती झाली आहे. आमदार प्रसाद गावकर यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. आता जागावाटपसंदर्भातील बोलणी येत्या आठवडाभरात होणार असून त्यानंतरच युतीची जाहीर घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले.