वृत्तसंस्था/ मुंबई
भारतामध्ये एफ-1 मोटर रेसिंग अंतर्गत होणाऱया फॉर्म्युला रिजनल इंडियन रेसिंग चॅम्पियनशीप आणि फॉर्म्युला-4 इंडियन चॅम्पियनशीप स्पर्धेची पहिली आवृत्ती लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत.
भारतामध्ये पहिल्यांदाच मोटर रेसिंग स्पर्धा पुढील फेब्रुवारीमध्ये भरविली जाणार आहे. या स्पर्धांचे यजमानपद रेसिंग प्रमोशन्सने स्वीकारले आहे. सदर मोटर रेसिंग स्पर्धा देशातील नवी दिल्ली, चेन्नई, कोईमतूर आणि हैद्राबाद या चार शहरांमध्ये होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना एफआयए सुपर लायसन्स गुण दिले जाणार आहेत. त्याशिवाय फॉर्म्युला रिजनल आणि एफ-4 इंडिया या मोटर शर्यतींना पाठिंबा दर्शविण्यासाठी भारतामध्ये इंडियन रेसिंग लिग स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धांसाठी यापूर्वीच शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भारतीय रेसिंग मंडळामध्ये अरमान इब्राहिम, आदित्य पटेल, भारताचा माजी एफ-1 रेसिंग चालक नारायण कार्तिकेयन व भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा समावेश आहे.