साऊदम्प्टन कसोटी, चौथा दिवस : उपाहाराअखेर बिनबाद 41, पावसाचा व्यत्यय
वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन
यजमान इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतर पाकिस्तानने आपल्या दुसऱया डावात 18 षटकात बिनबाद 41 धावा केल्या. दरम्यान, त्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय आल्यानंतर उपाहारानंतरही उशिरापर्यंत खेळाला सुरुवात होऊ शकली नव्हती. या लढतीत इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 583 धावांवर घोषित केल्यानंतर पाकिस्तानला पहिल्या डावात सर्वबाद 273 धावांपर्यंत मजल मारता आली. नंतर इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतर त्यांनी सावध खेळावर भर देणे पसंत केले. पाकिस्तानचा संघ या लढतीत अद्याप 269 धावांनी पिछाडीवर आहे.
उपाहाराच्या वेळी जोरदार संततधार झाल्यानंतर मैदान बरेच ओलसर झाले आणि त्यानंतर तातडीने खेळ सुरु होणे शक्यही नव्हते. पावसाच्या व्यत्ययामुळेच येथे उपाहारासाठी खेळ वेळेपूर्वीच थांबवावा लागला होता.
पाकिस्तानने सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी बिनबाद 0 वरुन डावाला पुढे सुरुवात केली आणि त्यांच्या सलामीवीरांनी शान मसूद (नाबाद 13) व अबिद अली (नाबाद 22) यांनी पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी बिनबाद 41 पर्यंत मजल मारुन दिली. तत्पूर्वी, इंग्लिश क्षेत्ररक्षकांचे खराब क्षेत्ररक्षणही त्यांच्या पथ्यावरच पडले. विशेषतः जलद गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर तीन झेल सोडले जाणे आश्चर्याचे ठरले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 8 बाद 583 घोषित.पाकिस्तान पहिला डाव : सर्वबाद 273 (अझहर अली 272 चेंडूत नाबाद 141, रिझवान 53. जेम्स अँडरसन 23 षटकात 5-56, ब्रॉड 2-40, वोक्स, बेस प्रत्येकी 1 बळी) पाकिस्तान दुसरा डाव : 18 षटकात बिनबाद 41. (शान मसूद नाबाद 13, अबिद अली नाबाद 22. अवांतर 6).
अँडरसनच्या गोलंदाजीवर 3 झेल सोडले गेल्याने ‘टिवटिवाट’!
इंग्लंडचा जलद गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींच्या उंबरठय़ावर आहे. पण, त्याच्या गोलंदाजीवरच इंग्लिश क्षेत्ररक्षकांनी 3 झेल सोडल्याने ट्वीटरवरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली. अँडरसनच्या खात्यावर 597 बळी असताना इंग्लिश क्षेत्ररक्षकांनी चक्क 3 झेल सांडले.
38 वर्षीय अँडरसन आता चौथ्या व पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकल्यास 600 बळींचा माईलस्टोन गाठण्यासाठी प्रयत्न करु शकेल. अँडरसनने या लढतीत खेळाच्या दुसऱया दिवशी 3 बळी घेतले. त्यानंतर त्याला 600 बळींच्या माईलस्टोनसाठी आणखी 4 बळी घेणे आवश्यक होते. त्याने तिसऱया दिवसाच्या खेळात पाकिस्तानच्या पहिल्या डावात अर्ध्या तासातच असद शफीकला बाद केले. त्यानंतर त्याची पाटी कोरी राहिली.
अपवाद म्हणून दुसरा नवा चेंडू घेतल्यानंतर अँडरसनने स्विंगचा जोरदार मारा सुरु केला आणि दोन षटकात तीनवेळा चेंडू बॅटची कड घेऊन मागे गेले. पण, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली व स्टुअर्ट ब्रॉड यांनी यावेळी झेल सोडले. कसोटीमध्ये 600 बळींचा टप्पा तीनच गोलंदाजांना सर करता आला असून लंकेचा मुरलीधरन (133 सामन्यात 800 बळी), ऑस्ट्रेलियन शेन वॉर्न (145 सामन्यात 708 बळी) व भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे (132 सामन्यात 619) यांचा त्यात समावेश आहे.