प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरालगतच्या उपनगरात वयोवृध्द जोडपे पाहुन महावितरण कंपनीच्या कर्मचाऱयांकडून त्यांच्या घरातील चालू मीटर फॉल्टी आहे असे सांगून ज्यादा पळणारा मीटर बसवला जात आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा अव्वाच्या सव्वा बीले येवू लागल्याने अगोदरच वयोवृध्द असलेल्या नागरिकांना बिल पाहून घाम फुटू लागल्याच्या घटना कोडोली परिसरात घडू लागल्या आहेत. त्याबाबत नागरिक आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. महावितरण कंपनीने असले प्रकार थांबवावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेच्यावतीने रमेश बोराटे यांनी दिला आहे.
सातारा शहरालगत कोडोली ग्रामंपचायतीच्या हद्दीत मळाई कॉलनी आहे. त्या मळाई कॉलनीत बाजीराव शिंदे हे वयोवृध्द त्यांच्या पत्नीसह राहतात.त्यांना यापूर्वी साडे चारशे ते तीनशे रुपयांपर्यंत वीज बिल येत होते. मात्र, गेल्या महिन्यात त्यांच्या घरी महावितरणचे काही कर्मचारी आले त्यांनी तो चालू मीटर फॉल्टी मीटर असल्याचे सांगून काढून नेला त्याजागी नव्याने मीटर बसवला. तसाच प्रकार त्या कॉलनी आणखी दोन जणांच्या बाबती केला आहे. नवीन मीटर बसवल्याने तब्बल 1900 रुपये बील आले. ते बील पाहताच त्यांना प्रश्न पडला तो कधीही बील न थकवता कसे काय एवढे बील आले. त्याचीही विचारपूस करायला महावितरणच्या कार्यालयात गेले असता त्यांना सरळ अधिकाऱयांनी धुडकावून लावले. पाठीमागची सर्व बिले त्यांना दाखवली तर महावितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱयांनी उर्मट वर्तणूक दिल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रमेश बोराटे यांना समजताच त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱयांना तुम्ही कुठे चुकता हे दाखवून देत हा प्रकार थांबवा अन्यथा आम्हाला आंदोलानाची भूमिका घ्यावी लागेल, असे ठणकावले आहे. दरम्यान, महावितरण कंपनीची नवीन मीटरच्या नावाखाली बनवेगिरी सुरु असून ती थांबवण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.