शिरोडा, साकोर्डा येथे घरांवर वृक्ष कोसळले, वीज पुरवठा ठप्प
प्रतिनिधी / फोंडा
राज्यात तीन दिवस संततधार कोसळणाऱया पावसाने फोंडा व धारबांदोडा तालुक्याला जोरदार तडाखा दिला. संपुर्ण फोंडा तालुक्यासह उसगांव, शिरोडा, दुर्भाट, बेतोडा-निरंकाल, साकोर्डा भागात पडझडीच्या अनेक घटना नेंद झाल्या. शिरोडा व साकोर्डा भागात घरांवर वृक्ष कोसळल्याने लाखो रुपयांची हानी झाली. फेंडा अग्निशामक दलाने सायंकाळपासून उशिरारात्रीपर्यत एकूण सुमारे 23 तक्रारी नोंद करण्यात आल्या. 3 अग्निशामक वाहनासह एकूण 15 फायर फायटरांनी मदतकार्य केले. काही ठिकाणी वीज पुरवठाही दिवसभर खंडीत झाला.
शिरोडा भागात पडझडीच्या अनेक घटना नोंद करण्यात आल्या. वादळी वाऱयामुळे काही परीसरातील घरावर झाड कोसळल्याने छप्पर व इतर सामानाची बरीच मोडतोड झाली. खंडित झालेला वीज पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु होते. शिरोडा बसस्थानकाजवळ कारगाडीवर झाड कोसळल्याने नुकसनी झाली. बाजारवाडा-बोळकर्णे साकोर्डा येथे घरावर झाड कोसळल्याने सुमारे रूपये लाखभराच्या मालमत्तेची हानी झाली. उसगांव आदीनाथ देवस्थानजवळ वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. तसेच दुर्भाट रोडवर झाड कोसळल्याने वाहतूक खोळबंली व वीजपुरवठा खंडीत झाला. खांडेपार नदीच्या प्रवाह बराच वाढला असून पावसाची गती अशीच कायम राहिल्यास जुन्या पुलापर्यत पाणी पोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संततदार पावसाने फोंडा व धारबांदोडा जोरदार तडाखा दिला आहे.