संजय सावंत / फोंडाघाट:
फोंडाघाट बाजारपेठ परिसरामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून फिरणाऱया मनोरुग्ण वृद्ध महिलेच्या मदतीसाठी फोंडाघाटवासीय पुढे सरसावले. जि. प. सदस्य संजय आग्रे यांच्या पुढाकाराने फोंडाघाटमधील ग्रामस्थांनी तिच्यासाठी तब्बल साठ हजार रुपयांची एका दिवसात जोडणी करीत पुन्हा एकदा आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवत या वृद्धेस पणदूर येथील जीवन आनंद आश्रम येथे आश्रय मिळवून दिला.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून फोंडाघाट परिसरातीलच ही आजी मनोरुग्ण असल्याने आपले घर आणि पतीला सोडून बाजारपेठ व अन्य ठिकाणी भटकत असायची. तिच्या घरातून तिच्यावर अनेकदा उपचारही करण्यात आले, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे ही आजी येणाऱया-जाणाऱयांना शिव्या देत, रस्त्याच्या मध्यभागी उभी राहत काठय़ा फिरवत इकडे तिकडे फिरत असायची. तिचे वय वाढल्याने आणि भर पाऊसात आणि काळोखात सुद्धा ती रस्त्याच्या मध्येच उभी राहत असल्याने तिचे होणारे हाल तसेच वाहन चालकांना होणारा धोका लक्षात घेऊन येथील जि. प. सदस्य संजय आग्रे यांनी पणदूर येथील जीवन आनंद आश्रमाचे संचालक संदीप परब यांच्याशी संपर्क साधला. यावेळी परब यांनी या तेली आजींना आश्रय देण्यास होकार दिला, मात्र आधीच या आश्रमात असलेले 137 आश्रीत बांधव त्यापैकी असलेले 78 मनोरुग्ण असलेले आश्रीत बांधव यांच्या या कोविड काळात देखभाल करताना होत असलेली आर्थिक ओढाताणीबाबतही कल्पना दिली.
यानंतर संजय आग्रे यांनी ही परिस्थिती फोंडाघाट हेल्प अकॅडमीचे सदस्य महेश सावंत याना सांगून आवाहन केल्याप्रमाणे फोंडाघाटमधील ग्रामस्थांनी या आजीसाठी मदत म्हणून तब्बल 60,000 रुपयाचा निधी एका दिवसात जमा केला आणि आज जीवन आनंद आश्रमाचे संदीप परब यांच्याकडे सुपूर्द करत या आजीला आश्रय मिळवून देत माणुसकीचे दर्शन घडविले.
या आजीला जीवन आनंद आश्रम येथे नेण्यासाठी आलेल्या संदीप परब आणि सौ. भक्ती परब यांचा फोंडाघाटवासीयांतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत आश्रमाचे कर्मचारी सौ. ज्योती आंगणे, एम. जी. कामत यासह फोंडाघाट येथील वैश्य समाज पतसंस्थेचे चेअरमन पारकर, महेश सावंत, आबा मर्ये, भाई हळदिवे, रमेश भोगटे, शेखर लिंग्रस, सिद्धेश पावसकर, विनोद मोदी, संजय नेरुरकर, विश्वनाथ जाधव, संतोष टक्के, संजय सावंत गुरुजी, ग्रामसेवक चौलकर, श्री. साळवी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.