प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मगो पक्षाच्या अमिना कुशेंद्र नाईक यांची 8 विरुद्ध 7 मतांनी निवड झाली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेले 8 नगरसेवकांचे संख्याबळ असूनही भाजपाचे उमेदवार आनंद पांडुरंग नाईक यांचा 1 मताने पराभव झाला. त्यामुळे भाजपासाठी हा निकाल म्हणजे अनपेक्षित धक्का ठरला.
विश्वनाथ दळवी यांची महिन्याभरापूर्वी नगराध्यक्षपदी निवड झाल्याने उपनगराध्यक्षपद रिक्त होते. शुक्रवारी सकाळी या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मगोतर्फे अमिना नाईक तर भाजपातर्फे आनंद नाईक यांनी प्रत्येकी 1 अर्ज भरला होता. मतदानाच्यावेळी सर्व पंधराही नगरसेवक उपस्थित होते. गुप्त मतदान होऊन मतमोजणी झाली, तेव्हा अमिना नाईक यांना 8 तर आनंद नाईक यांना 7 मते मिळाली.
मगोच्या उत्कर्षाचा संकेत देणारा निकाल- डॉ. भाटीकर
फोंडा पालिकेवरील या निकालाने बहुतेक नगरसेवक मगो पक्षाच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया मगोचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी व्यक्त केली. अमिना नाईक या दुर्गाभाट प्रभागातील नगरसेविका असून त्यांच्या विजयाने फोंडय़ात मगोच्या उत्कर्षाला पुन्हा सुरुवात झाल्याचे संकेत देणारी ही घटना आहे. यापूर्वी दुर्गाभाट येथूनच फोंडय़ात मगोच्या विजयाचा झेंडा फडकला होता, असे डॉ. भाटीकर म्हणाले. नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने फोंडय़ातील जनतेला चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी नमूद केले.
आपला हा विजय म्हणजे, सहकारी नगरसेवकांनी फोंडा शहरासाठी काम करण्याची दिलेली संधी आहे. मगो नेते सुदिन ढवळीकर, डॉ. केतन भाटीकर, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांच्या सहकार्याने नागरिकांना चांगली सेवा देणार असल्याची प्रतिक्रिया अमिना नाईक यांनी व्यक्त केली.
भाजपासाठी अनपेक्षित धक्का
आनंद नाईक यांनी हल्लीच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासह आमदार रवी नाईक यांचे पूत्र रितेश नाईक व विलीयम आगियार हे तिघे नगरसेवक भाजपात सामील झाल्याने फोंडा पालिकेवर भाजपाचे अधिकृत संख्याबळ 8 झाले आहे. मगोकडे 7 नगरसेवक आहेत. त्यामुळे आनंद नाईक हे सहज निवडून येतील अशी अपेक्षा होती. मात्र या अनपेक्षित निकालाने भाजपातील 1 किंवा 2 नगरसेवकांनी मगोच्या बाजूने मतदान केल्याची शक्यता वर्तविली जाते. शिवाय मगोतील एका नगरसेवकाने भाजपाच्या पारडय़ात मत टाकल्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपाच्या गोटातून तूर्त तरी या मतदानाविषयी कोणतीच जाहीर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र भाजपातील हा घरभेदी कोण? याबद्दल फोंडा पालिकेत चर्चा सुरु होती.
निर्वाचन अधिकारी म्हणून क्लेन मोदिरा यांनी काम पाहिले. यावेळी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक व मुख्याधिकारी केदार नाईक हे उपस्थित होते.