बंदावस्थेतील 16 शाळा नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत एनजीओकडे
प्रतिनिधी /फोंडा
आज विद्यार्थ्यांची खरी गरज ही डिजीटल शाळा आहे. राज्य सरकारने शिक्षणात अमुलाग्र बदलांसह नवीन शैक्षणिक धोरण अवलंबविण्याचा निर्णय नुकताच काढण्यात आलेला आहे. राज्यभरातील बंद पडलेल्या एकूण 68 प्राथमिक शाळा एखाद्या स्वयंसेवी संस्थेला चालविण्यासाठी देण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यामुळे फोंडा तालुक्यातील बंद पडलेल्या 16 प्राथमिक शाळांचे भाग्य परत एकदा उजळणार आहे.
फोंडा तालुक्यात एकूण 107 प्राथमिक शाळा असून त्यापैकी 4 हजेरी पटाच्या कमी संख्येमुळे हल्लीत बंद पडल्याची माहिती फोंडा तालुका भाग शिक्षणधिकारी कार्यालयातर्फे मिळालेली आहे. सरकारने जाहीर केलेल्या नोंदीप्रमाणे त्यापुर्वी फोंडा तालुक्यातील बंद पडलेल्या शाळामध्ये सरकारी प्राथमिक विद्यालय बोणयेवाडा सावईवेरे येथील शाळा सन 1992-93 पासून बंद आहे. वेलकास सावईवेरे (2000-01), तळसाय बोरी (2016-17), हळदय शिरोडा (2013-14), खारवाडा बांदोडा (2009-10), पालसरे केरी (1995-96),कोने प्रियोळ (2006-07), करमणे डोंगर शिरोडा (2018-19), कोनशे निरंकाल (2019), अमळाय पंचवाडी (1996-97), माणके शिरोडा(2002-03), माट्टीधाड निरंकाल (2011-12), देवड्डे शिरोडा (2014-15), सोनारबाग उसगांव (1998-99), शिलवाडा सावईवेरे (2006-07), सरकारी प्राथमिक विद्यालय पेडे शिरोडा (2013-14) पासून बंद असून तिचा उपयोग सद्यपरिस्थितीत अंगणवाडी म्हणून करण्यात येत आहे.
राज्यातील सद्या अंगणवाडी भाडय़ाच्या खोलीत असूनही आपला कारभार चोख चालविण्याकडे कल दिसून येतो. दोन मुले असतानाही अंगणवाडी सुरळीत चालतात मात्र त्याच भागातील ती दोन मुले पुढे प्राथमिक विद्यालयात दाखला न घेता एखाद्या ईग्रजी माध्यमाच्या विद्यालयात दाखला घेण्यावर भर दिसतो. प्रत्येक पालकाला अट्टाहास आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळामध्ये दाखला देण्याचा वाढल्यामुळे सध्या मराठी शाळा बंद पडत आहे. सद्या अशा बंदावस्थेतील ज्ञानमंदिराचा सदुपयोग करून घेण्याचा सरकारचे पाऊल उचलविल्याबद्दल अनेक सुज्ञ नागरिकांनी अभिनंदन केले आहे.