प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाचे (आयडी) कोविड इस्पितळात रुपांतर करताना, इतर रुग्णांची कुठलीच गैरसोय होणार नाही, असे आश्वासन सरकारी अधिकारी व डॉक्टर्सनी दिले होते. फर्मागुडी येथील आयएमएच्या ज्या ‘दिलासा’ इस्पितळात उपजिल्हा इस्पितळ स्थलांतरीत केलेले आहे, तेथे गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णांची वैद्यकीय सेवे अभावी परवड चालल्याचे मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले.
फोंडय़ात उपजिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करण्यास, डॉ. भाटीकर व अन्य मगो नेत्यांनी विरोध केला होता. त्यावेळी येथील डॉक्टर्स व उपजिल्हाधिकाऱयांनी डॉ. भाटीकर यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान उपजिल्हा इस्पितळातील सर्व वैद्यकीय सेवा दिलासामध्ये रुग्णांना मिळतील असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दिलासामध्ये जाणाऱया बहुतेक रुग्णांना बांबोळी येथील गोमेकॉत पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. फोंडा तालुक्याबरोबरच शेजारील धारबांदोडा तालुक्यातील सर्वसामान्य जनता वैद्यकीय सुविधांसाठी फोंडय़ातील आयडी इस्पितळावर अवलंबून आहे. दिवसाकाठी शंभरहून अधिक रुग्ण छोटय़ा मोठय़ा उपचारांसाठी येथील ओपीडीला भेट देतात. अपघात किंवा अन्य आपत्कालीन वेळी रुग्णांना फोंडय़ातील हेच इस्पितळ जवळचे आहे. त्यामुळे याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. सीटीस्कॅन, एमआरआय यासारखी चाचणी निदान यंत्रणा तर अंत्यत आवश्यक असून इस्पितळ सुरु होऊन आठ वर्षे उलटली तरी ही सुविधा याठिकाणी उपलब्ध झालेली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पुरेशा सुविधा अभावी फोंडा तालुक्यातील रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहेत, असे डॉ. भाटीकर यांनी सांगितले.
अनेक वैद्यकीय सुविधा कागदावरच
सन् 2007 साली फोंडय़ातील जुने आयडी इस्पितळ पाडून त्याठिकाणी सुसज्ज असे उपजिल्हा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर 2012 मध्ये उपजिल्हा इस्पितळ जनतेसाठी खुले करण्यात आले. मात्र येथील बहुतेक वैद्यकीय सेवा या कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे फोंडय़ात उपजिल्हा दर्जाचे इस्पितळ असूनही रुग्णांना छोटय़ा मोठय़ा शस्त्रक्रिया किंवा एमआरआय, सीटीस्कॅनसारख्या चाचण्यांसाठी बांबोळी शिवाय पर्याय राहिलेला नाही. फोंडा तालुक्यातील शहरी भागाबरोबरच माशेल, बाणस्तारी, शिरोडा, मडकई, उसगांव खांडेपार, बेतोडा, निरंकाल, दुर्भाट, आगापूर, सावईवेरे, केरी आदी विविध भागातील सर्वसामान्य रुग्ण या इस्पितळावर अवलंबून आहेत. शेजारील धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा, मोले, कुळे या भागातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी फोंडय़ात येतात. दोन महिन्यापूर्वी आयडी इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करताना आरोग्य संचालक, उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच उपजिल्हाधिकाऱयांनी आयडी इस्पितळात असलेल्या सर्व सुविधा दिलासा इस्पितळात मिळणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात पर्यायी सोय असलेल्या दिलासा इस्पितळात येणाऱया बहुतेक रुग्णांना बांबोळी येथील गोमेकॉचा मार्ग दाखविला जातो. रुग्णांची चाललेली ही परवड अजून किती काळ चालणार असा सवाल डॉ. भाटीकर यांनी उपस्थित केला आहे.
आजारापेक्षा इलाज भयंकर
सध्या कोरोना महामारीमुळे सार्वजनिक बस वाहतूक मर्यादित स्वरुपात सुरु आहे. अनेक ग्रामीण भागांत तर वेळेत प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला उपचारासाठी बांबोळीला जाणे परवडणारे नाही. दिलासा इस्पितण्घ्त अस्तीरोग, डोळय़ांची तपासणी, दंत चिकित्सा व इतर उपचारासाठी येणाऱया रुग्णांना ही सेवा पूर्वीसारखी मिळत नाही. आपत्तकालीन वेळी अपघात होऊन एखाद्याचा हातापाय मोडल्यास बांबोळी किंवा खासगी इस्पितळात उपचार घेण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. गर्भवती महिला व लहान मुलांनाही वैद्यकीय सेवा मिळविताना अनेक अडचणिंना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे फोंडय़ातील आम जनतेची परिस्थिती ‘आजारापेक्षा इलाज महाग’ अशीच झाली आहे.
ग्रामीण आरोग्य केंद्राचीही स्थीती बिकट
उपजिल्हा इस्पितळाबरोबरच फोंडा तालुक्य़ातील ग्रामीण आरोग्य केंद्रातही वेगळी स्थिती नाही. बऱयाच आरोग्य केंद्रावर वेळेत डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याने किंवा आवश्यक उपचार मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खिशाला परवडत नसतानाही खासगी इस्पितळात जाऊन महागडे उपचार घेणे भाग पडत आहे. कोरोना महामारीचे सावट ओसरल्यानंतर तरी उपजिल्हा इस्पितळात एमआरआय, सिटीस्कॅन व इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील काय ? असा प्रश्न डॉ. भाटीकर यांनी उपस्थित केला आहे.
आयडी इस्पितळातील कोम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणजेच सामाजिक आरोग्य केंद्राचे तिस्क फोंडा येथील जुन्या इमारतीमध्ये स्थलांतर केले असले तरी प्रत्यक्षात याठिकाणी ही सेवा अद्याप सुरु झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.