झाडांची पडझड : भर रस्त्यात कोसळले पत्र्याचे छप्पर
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा तालुक्यात बुधवारी सकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कायम होता. दिवसभर कोसळणाऱया सरींनी तालुक्याच्या विविध भागांना झोडपून काढले. सकाळी आलेल्या जोरदार वाऱयामुळे ठिकठिकाणी किचीत पडझडीच्या घटना घडल्या. बहुतेक झाडे रस्त्यावर कोसळली. पंडीतवाडा-फोंडा येथील गजबजलेल्या रस्त्यावर बाजूच्या इमारतीवरील पत्र्याचे छप्पर कोसळले. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसून रस्त्यावरील वाहनेही त्यापासून बचावली.
फोंडा अग्नीशामकदलाकडून मिळालेल्या माहितीनूसार खारवडे-बांदोडा येथे रस्त्यावर माड पडला तर निरंकाल-बेतोडा येथील मुख्य रस्त्यावर झाड पडून बराच वेळ वाहतूक खोळंबली. कुर्टी येथील सैनिके प्रशिक्षण कँपमधील रस्त्यावरही झाड कोसळले. फोंडा येथील कदंब बसस्थानकावर झाड कोसळल्याने बाजूला पार्क केलेल्या दुचाक्यांना त्याची किंचित झळ बसली. वाडे-तळावली येथे एका घरावर कोसळण्याच्या स्थितीत असलेले झाड अग्नीशामक दलाच्या पथकाने बाजूला हटविले. पाऊणवाडा-दोनखांब येथे आंब्याचे झाड अंतर्गत रस्त्यावर पडल्याने तेही हटविण्यात आले. फोंडा अग्नीशामक केंद्राचे स्टेशन अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वाहनांसह कर्मचारी दिवसभर मदतकार्यात गुंतले होते.